*श्रीराम समर्थ*
*समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशकृ १२-विवेक-वैराग्य,समास ७- विषयत्याग,निरूपण क्रमांक ४६६ – भाग २ मधील सार.*
दासबोधातील बाराव्या दशकातील सातव्या समासामध्ये समर्थ वक्त्याच्या भूमिका आपल्यासामोर मांडत आहेत.
श्रोत्याने मनातला प्रश्न बोलून दाखवला की,संतमंडळी हे प्रापंचिक सुख भोगतात, त्यांच्या जीवनात विषयत्याग घडलेला नाही तरीदेखील भगवद् भक्ती प्राप्त केली याचा अर्थ परमार्थप्राप्तीसाठी विषयत्यागाची गरज नाही का? आणि जर आम्ही तसा विषयत्याग केला नसेल तर आम्हांला भगवंत का प्राप्त होत नाही? अशा दृष्टीने एकप्रकारे मनातली खळखळ एका प्रश्नाच्या आधारे श्रोत्याने व्यक्त केली आहे.
वक्त्याच्या भूमिकेतून मानसिकता बघितली तर मनुष्य जीवनात येऊन सामान्य जीवात राहून संतपदापर्यंत पोहचणे यासारखे दुसरं कुठलेही अग्नीदिव्य नाही. संतांना या सामाज जीवनात प्रचंड निंदेला सामोरे जावे लागते. संतांना देहामध्ये ओळखण्याची पात्रता प्रापंचिकामध्ये नाही. कालचेच महाराजांचे प्रवचन होते की संत विषयात देव पाहतात तर प्रापंचिक देवामध्ये विषय पाहतो हाच प्रापंचिकांमधला आणि संतांमधला फरक आहे. या सगळ्यांच्या मागे आसक्तीचे मूळ आहे. आसक्तीपायी प्रापंचिकाच्या मनात कितीतरी प्रकारचे द्वेष, मत्सर हे सतत जागृत होतात.
प्रापंचिकाची मानसिकता अशी असते की ते संतांचे निर्मळत्व बघू शकत नाही ते त्यांच्यावरचे शेवाळच बघतात. प्रापंचिक हा कल्पना विलासाने संताबरोबर स्वतःची तुलना करू लागतो, आणि मग त्याच्या मनात प्रश्न येतो की त्याच्या आणि माझ्या बाबतीत खाण्यापिण्याच्या गोष्टी, मुलाबाळांच्या गोष्टी, प्रपंचातल्या पैशाच्या गोष्टी या सगळ्या गोष्टी साधर्म्यात आहेत, पण संतांना मात्र जगाने मान्यता दिली, ते जगत् वंद्य झाले,संतांची संपत्ती, त्यांचा आधिकार,त्यांचे जनप्रियत्व,लोकप्रियत्व याची तुलना जगातल्या कुठल्याही संपत्तीवान, लौकिकता असलेला एखादा मनुष्य, एखादा खेळाडू, संगीतकार,गायक यांची कोणाशीही तुलना होवू शकत नाही.असे आद्वितीय त्यांचे व्यक्तीमत्व आहे. आणि अशा संतांनी प्रापंचिकाच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी देखील संसार केला, मुलबाळं झाली, सर्व प्रकारचे उत्तम उपभोग भोगले, हे सर्व विषय त्यांनी देखील भोगले आणि ते मात्र एवढे लोकप्रिय होवून गेले, संजीवन होवून गेले आणि आम्ही प्रापंचिक त्यांच्या सारख्याच गोष्टी करत असताना आमची मात्र ओळख बाराव्या नंतर देखील कोणी ठेवत नाही अशी परिस्थिती आहे.त्यामुळे समर्थ म्हणतात ........
*येर मत्सर करितांच गेलीं!अन्न अन्न म्हणतां मेलीं!*
*कित्येक भ्रष्टलीं ! पोटासाठीं !!१२.७.११.!!*
*ऐसे प्रकारीचे जन ! आपणास म्हणती सज्जन !*
*पाहों जातां अनुमान ! अवघाच दिसे !!१२.७.१३.!!*
वक्त्याला असा प्रश्न नेमका मत्सरातून आलेला आहे. सामान्य जीवाची अवस्था संतांकडे बघताना एकच असते की हे सगळं तुझ्यात आणि माझ्यात सारखे आहे, पण तुला जी लोकप्रियता, जे जनप्रियत्व, तुझी जी संजीवन अवस्था झाली ती आम्हांला मिळू शकत नाही, मला मिळत नाही ना मग हे तुला देखील योग्य दिसत नाही. आम्ही प्रपंच करतो पण आम्हांला तुझ्यासारखे पद मिळू शकत नाही. मग आम्हांला नाही तर तुलाही नाही या मत्सरापोटी हा प्रश्न श्रोता बोलून दाखवत आहे.
*मज नाहीं तुज साजेना ! हें तों अवघें ठाउकें जना !*
*खात्यास नखातें देखों सकेना ! ऐसें आहे !!१२.७.१५.!!*
एखादा मनुष्य जर भुकेलेला असेल आणि त्याचवेळी समोरचा मनुष्य जर ताटभर अन्न घेऊन जेवत असेल तर स्वाभाविक मत्सरापोटी भूकेल्या माणसाला तो जेवत असलेला मनुष्य जसा सहन होत नाही, तसं प्रापंचिकाला परमार्थात अत्यंत अग्रेसर असलेल्या संतांच्या जीवनाकडे बघून त्याच्या अंतरंगात मत्सर निर्माण होतो की आम्ही असे रिकामे पोटी बसलेलो, आम्हांला तर कोणी विचारत नाही आणि हे मात्र सर्व जनमानसांत एवढे प्रचंड स्थान मिळवून गेले. त्यामुळे मला खायला मिळत नाही तर तुलाही नको अशा भूमिकेतून हा प्रश्न निर्माण झालाय की संत देखील विषयातच होते आणि आम्ही देखील विषयातच आहोत मग त्यांच्यात आणि आमच्यात एवढा फरक कशा दृष्टीने पडावा.
समर्थ आणखीन एक नविन दिशा या विचारांमध्ये आपल्याला देतात ती म्हणजे या जगामध्ये चालणारी बूवाबाजी. अनेक लोक बाह्यांगाने आपले संतस्वरूप दाखवत असतात. संतांसारखेच ते कपडे घालतात, आचरणही संतांसारखेच करतात, त्यांच्यासारखेच बोलतात, सर्वकाही बाह्यांगाने त्यांची अवस्था संतांसारखी असते, त्याचप्रमाणे जीवनामध्ये विलास देखील ग्रहण करत असतात, अशा या विलासाकडे बघून त्या साधुविषयी आपल्या मनात संभ्रम निर्माण होवू शकतो.
पण असे ढोंग फार काळ टिकू शकत नाही. एकना एक दिवस ते ढोंग तुटते, हा निळा कोल्हा कुईकुई करत आपल्या कोल्ह्यामध्ये जसा जावून बसतो त्यापद्धतीने देहबुद्धीच्या आधारे ते संतांसारखे ढोंग जरी बाहेरून कितीही केलं तरी ते टिकणारे ढोंग नसते. त्यामुळे अशी लोकं कुठं ना कुठंतरी फसतात आणि मग त्यावेळेला आपल्या मत्सराला अगदी छान वृक्षरूप प्राप्त होतं की, आम्ही म्हणतच होतो ना हे सगळे नुसते बाहेरून दाखवणारी प्रकरणं आहेत, यांच्या आत काही नसतं हो, हे आपल्यासारखेच आहेत, आणि हे एक जसे आहेत तसेच सगळे आहेत अशी आम्ही आमच्या मनाची समजून काढतो आणि त्यामुळे या बुवाबाजीपायी आम्ही बऱ्याचदा खऱ्या संतांवरती देखील अशाच प्रकारचे डाग लावत असतो. समर्थ म्हणतात की.....
*वैराग्य मुळींहून नाहीं ! ज्ञान प्रत्ययाचें नाहीं !*
*सुचि आचार तोहि नाहीं!भजन कैंचें !!१२.७.१२.!!*
अशा बहुरूपी संतांच्या अंतरंगात खरे वैराग्य नाही, ज्ञान नाही, आचार नाही, भजन-पूजन नाही परंतु अशी लोकं जेव्हा सज्जन म्हणून या समाज जीवनामध्ये वावरतात त्यावेळी अशा प्रश्नांना सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये स्थान प्राप्त होत असते.
त्यामुळे अशा प्रश्नांना निर्माण होण्याची दोन कारणे एक प्रापंचिकाच्या अंतरंगातला मत्सर आणि समाजामध्ये चालणारी बुवाबाजी जी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती पकडली जाते. मग ही अशी पकडली गेलेली बुवाबाजी एका संतांच्या विषयत्यागाला काळाच्या पडद्याआड घेऊन जाते. आणि सामान्य माणसाच्या अंतरंगामध्ये असा संशय निर्माण करते की हे सर्वकाही विषयामध्येच गुंतलेले आहेत.त्यामुळे आपण आणि ते वेगळे नसूनही त्यांना या जगामध्ये एवढं प्रचंड स्थान कशा दृष्टीने प्राप्त झालं, त्यांनी हा परमार्थ कसा प्राप्त केला, ते या विषयामध्ये असताना देखील भगवंताशी कसे तद्रूप होवू शकले.
जानकी जीवन स्मरण जय जय राम
लक्ष्मीकांत खडके
🙏