सद्गुरु

*लोकसत्ता :: चिंतनधारा ४५. वारियाने कुंडल हाले :: ०७ मार्च * ४५. वारियाने कुंडल हाले हे अज्ञान आणि भवदु:खाचं निवारण केवळ खरा सद्गुरूच करतो. वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले! अनन्य भक्त आणि सद्गुरूतील विशुद्ध प्रेमभावाचं हे अजरामर शब्दचित्र आहे. ‘वारियाने’ म्हणजे निवारण करणाऱ्याने! हे कशाचं निवारण आहे आणि हा निवारण करणारा कोण आहे हो? तर हे अज्ञानाचं आणि त्यायोगे समस्त भवदु:खाचं निवारण आहे. एकदा का अज्ञान ओसरलं की मग भ्रम, मोह, आसक्ती, लोभ यांचं निवारण तत्काळ होणारच. एकदा यांचं निवारण झालं की भवदु:खाचं निवारण होणारच. तर हे अज्ञान आणि भवदु:खाचं निवारण केवळ खरा सद्गुरूच करतो. हे अज्ञान म्हणजे तरी काय हो? जे माझं नाही ते मला माझंच वाटतं, माझेपणाच्या मोहानं मी आसक्ती पोसतो. ते माझंच राहावं यासाठीच्या धडपडीतून लोभ, द्वेष, मत्सर आदी भावनाही उफाळून येत असतात. तेव्हा या जगातल्या ज्या ज्या वस्तू माझ्या वाटय़ाला आल्या आहेत, जी जी माणसं माझ्या जीवनात आली आहेत त्यांच्यात माझेपणानं आसक्त होणं हेच अज्ञान आहे. हे अज्ञानच जिवाला भवसागरात बुडवणारं आहे. या ‘माझेपणा’च्या भावनेतला फोलपणा सद्गुरू लक्षात आणून देतात. शिर्डीत एकदा गंजींना आग लागली. आगीत सर्व गंजी भस्मसात झाल्या तर अन्नधान्यावाचून जिणं मुश्कील होईल, या भीतीनं घाबरून गावकऱ्यांनी बाबांकडे धाव घेतली आणि त्यांची आळवणी सुरू केली. बाबा त्या गंजींजवळ आले आणि त्यांनी पेट घेतलेल्या गंजीभोवती पाणी ओतलं. म्हणाले, ‘‘ही गंजी तेवढी भस्मसात होईल. ती जळून जाऊ  द्या. ती विझविण्याचा प्रयत्न करू नका.’’ पण ज्याची गंजी जळली तो भागचंद मात्र रडू लागला. ‘माझी’ गंजी बाबांनी वाचवली नाही, या भावनेनं तो धुसफुसत होता. बाबा म्हणाले, ‘‘जमिनीनं बीज धारण केलं, मेघांनी पाऊस पाडला, यात सूर्याचीही भूमिका होती. तेव्हा हे या गंजीचे तीन-तीन मालक असताना हा भागचंद ‘माझी’ ‘माझी’ करत तिच्यावर मालकी सांगणारा कोण?’’ रामदास म्हणत ना? की, माणूस घराच्या आसक्तीत जखडतो.. पण उंदीरसुद्धा या घराला ‘माझं घर’ म्हणत असतात.. पालीसुद्धा म्हणतात ‘माझं घर’, कीडेमुंग्यासुद्धा म्हणतात ‘आमचं घर’.. ज्या देहाला आपण ‘आपला’ असं नि:शंकपणे मानतो त्या देहातले दात आपल्याला न विचारता पडतात, त्वचाही आपल्याला न विचारता सुरकुतते, डोक्यावरचे केसही आपली परवानगी न घेताच पांढरे होऊ  लागतात! अर्थात या देहापासून ते या चराचरातील सर्वच वस्तुमात्रापर्यंत काहीही खऱ्या अर्थानं ‘माझं’ नाही! ही ‘माझेपणा’ची भ्रामक आसक्ती तेवढी माझी आहे! ती निवारण्यासाठीच सदगुरू आला आहे. तेव्हा ‘वारियाने’ म्हणजे सद्गुरूने! आता ‘कुंडल’ म्णजे काय? तर कुंडल म्हणजे तळं. हे तळं आहे ‘कर्णकुंडल’ म्हणजे कान आणि हे कुंडल आहे त्या कानात साठलेलं अंत:करण. कान वेगळे आणि मन वेगळं, असं आपण मानतोच. पण कानांच्या माध्यमातून ऐकतं ते मनच! जे ऐकलं त्याचं सुख-दु:ख कानाला नव्हे मनाला होतं! स्तुती वा निंदा ऐकून कान शेफारतात किंवा क्रोधानं फणफणत नाहीत, मनावरच तो परिणाम होतो. तेव्हा ‘वारियाने’ हालचाल होते ती या अंत:करणरूपी कुंडलातच. ही हालचाल कशानं होते? तर सदगुरू बोधाचं जे वारं कानात शिरतं त्यानं तोवर अज्ञानदशेत निपचित संथावलेल्या तळ्यावर अनंत तरंग उत्पन्न होतात! तोवर मनात पक्क्या झालेल्या भ्रामक धारणेला बसलेल्या तीव्र धक्क्याचे हे तरंग अंतर्मनाला खडबडून जाग आणत असतात!

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर
Rajkumar Puri Mar 6, 2021

+17 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 68 शेयर

*लोकसत्ता :: मनोयोग ४५. षट्विकारदर्शन : काम-२ :: ०७ मार्च* ४५. षट्विकारदर्शन : काम-२ :: माणसाच्या मनात क्षणोक्षणी कामना उत्पन्न होत असतात. ‘मी म्हणजे देहच’ माणसाच्या मनात क्षणोक्षणी कामना उत्पन्न होत असतात. ‘मी म्हणजे देहच’ या धारणेतच जगत असल्यानं या देहाला जे जे सुखकारक ते ते मिळवण्याची आणि टिकवण्याची कामना सदोदित सतेज असते. अध्यात्माच्या मार्गावर आल्यावरही देहाचा प्रभाव तसूभरही ओसरला नसतो. उलट देहाला थोडे कष्ट होऊ द्यात, थोडा आजार येऊ द्यात, अशक्तपणा येऊ द्यात, मनात लगेच येतं, मी देवाचं एवढं करीत असताना माझ्या वाटय़ाला हा आजार का? तेव्हा अनंत कामना मनात उत्पन्न होतात आणि त्यांची पूर्ती देहाच्याच आधारे, देहाच्याच माध्यमातून होत असल्यानं देहाला जपण्याची जाणीव खोलवर जागी असते. आपण आधीच पाहिलं होतं, त्याप्रमाणे देहाच्या माध्यमातून विकार भोगले जात असले तरी देहाला विकारांची ओढ नसते. ती ओढ मनाला असते! जसं डोळ्यांना पाहाण्याची ओढ नसते, डोळ्यांद्वारे पाहाण्याची ओढ मनाला असते! कानांना ऐकण्याची ओढ नसते, कानांद्वारे ऐकण्याची ओढ मनाला असते! अगदी त्याचप्रमाणे इंद्रियांच्या बळावर विकारांचं ‘सुख’ भोगलं जात असलं तरी त्या ‘सुखा’ची ओढ देहाला नसते, मनालाच असते. म्हणूनच या मनालाच समर्थ सांगत आहेत.. नको रे मना काम नानाविकारी।। हे मना, अनंत विकारांना जन्म देणाऱ्या कामना विकाराचा सोस नको! आता गेल्या भागात आपण काही प्रश्न मांडले होते आणि त्याचा थोडा मागोवाही घेतला होता. ते प्रश्न म्हणजे, मुळातच कामनांमध्ये गैर काय? भौतिक आणि शारीरिक सुख भोगता येईल अशा क्षमतांनी जर देह युक्त आहे, तर त्याच्या आधारे ते सुख भोगण्यात गैर काय ? अशा शारीरिक सुखानं जर मानसिक आणि भावनिक आनंद लाभत असेल तर देहवासनेला हीन का मानावं? भले प्रत्येक कामनेची पूर्ती होईलच असं नाही, तरीही त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्यात वाईट काय? या प्रश्नांचा थोडा मागोवा घेताना आपण पाहिलं की नदी जशी प्रवाहित होत जाते तसे आपण अनुभवांतून पुढे जात राहिलो तर काही हरकत नाही. म्हणजे मनात कामना उत्पन्न होण्याचा अनुभव, तिच्या पूर्ती वा अपूर्तीचा अनुभव.. यातूनही आपण त्यापलीकडे जात राहिलो, तर कामना उत्पन्न होण्यात काही गैर नाही. अडचण तेव्हा होते, जेव्हा कामना पूर्तीच्या अनुभवाला आजन्म टिकवून ठेवण्याच्या इच्छेत मन अडकतं किंवा कामना अपूर्तीच्या अनुभवानं खचून जातं, क्रोधीष्ट होतं, पशुवत् वागतं! त्यामुळे कामना विकाराचा पाश संपूर्ण जीवनावर परिणाम घडवू शकतो. जीवन दिशाहीनही करू शकतो. त्यासाठी साधकानं तरी अत्यंत सावधपणे या विकाराच्या खोडय़ातून सुटलंच पाहिजे, असं समर्थ सांगत आहेत. दुसरी गोष्ट देहसुखाला संतांनी हीन ठरवलं आहे, याचं कारण नीट लक्षात घेतलं पाहिजे. भौतिक सुखासाठी, देहसुखासाठी प्रयत्न करण्याचा बोध माणसाला करावा लागत नाही. त्याचा जन्म वासनेतच होतो आणि जन्मभर तो वासना पूर्तीसाठीच धडपडत असतो. लहान मूल बालवत् इच्छांच्या पूर्तीसाठी धडपडत असतं. रडत असतं. हट्ट करत असतं. तारुण्यात वासनेची व्याप्ती वाढली असते. वासनापूर्तीचा हट्टाग्रह अधिक खोलवर रुजला असतो आणि वासनापूर्तीसाठीचे प्रयत्न अधिक क्षमतेनिशी होतात. तेव्हा माणसाला देहसुखासाठी प्रेरित करावंच लागत नाही. उलट देहसुखात अडकलेल्या माणसाला त्या देहापलीकडे विचार करण्यासाठी प्रेरित करावं लागतं. संतांनी देहसुखावर कोरडे ओढले म्हणूनच तर आत्मसुख नावाचंही काही सुख आहे, याकडे माणसाचं लक्ष तरी गेलं! समोर सरळ रस्ता असूनही गुरं आजूबाजूला भरकटतातच. त्यांना नुसत्या शब्दांनी सांगून कळत नाही. षट्विकारांबरोबर भरकटणाऱ्या माणसाला सरळ रस्त्यावर आणण्यासाठी म्हणूनच संतांनी त्या विकारांवरच कोरडे ओढले. -चैतन्य प्रेम

0 कॉमेंट्स • 2 शेयर
Rajkumar Puri Mar 6, 2021

+13 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 20 शेयर