मनाचे श्लोक

*लोकसत्ता :: मनोयोग ४८. षट्विकारदर्शन - - क्रोध-३ :: १० मार्च* शीघ्रकोपी, दीर्घकोपी, बलहीनकोपी आणि सुप्तकोपी; या चारपैकी कोणत्या तरी एका गटात आपणही मोडतो. क्रोधाचा प्रकार कोणताही असो, तो वाईटच. कारण तो अंत:करणावर नकारात्मक ठसा उमटवतोच आणि शरीरावरही विपरीत परिणाम करतो. आता एक साधनामार्गी म्हणाला की, अमुक एक सत्पुरुषही तर तापटच होते! आता त्यांच्या क्रोधामागचं रहस्य आणि त्या क्रोधानं साधत असलेलं दुसऱ्याचं हित कसं कळणार? पण त्याला म्हणालो की, त्यांच्यासारखं तुम्ही नि:शंक, निर्भय आणि नि:स्संग वृत्तीचे व्हा, मग तुम्हीही चिडलात तरी हरकत नाही! बघा हं, सत्ता आणि संपत्तीच्या बळावर स्वत:च्या ताकदीबद्दल, आवाक्याबद्दल नि:शंक किंवा निर्भय झाल्याचा माणसाचा समज होऊ शकतो, पण त्याची वृत्ती फकिरासारखी नि:स्संग होणं मात्र सोपं नसतंच. काय आहे, सत्पुरुषातलाही आपल्या सोयीचा स्वभावविशेष आपण ढालीसारखा जवळ करतो, पण त्यांच्या वृत्तीनुसार आपली वृत्ती घडविण्याच्या अभ्यासात तेवढा रस दाखवत नाही. असो. तर साधन मार्गावर चालू लागताच आपल्यातल्या विकारांची आपल्याला जाणीव होते. त्यांच्यावर स्वबळावर ताबा मात्र काही केल्या साधत नाही. त्यातही काम, मद, मत्सर, दंभ आणि लोभाला काही प्रमाणात दुसऱ्यापासून लपवता येतं. कारण ते विकार अत्यंत सुप्त असतात ना! त्यामुळे दुसऱ्याला ते जाणवतीलच असं नाही, पण क्रोधाचं मात्र तसं नाही! क्रोध उत्पन्न होताच आपल्या वागणुकीत तात्काळ काही ना काही नकारात्मक बदल घडतोच. दुसऱ्यावर किमान मानसिक आघात केल्याशिवाय तरी हा क्रोध शांत होत नाही. त्यामुळे साधनेचा मार्ग, साधनेचा विचार, त्यातून साध्य करायची असलेली मन:शांती याच्या विपरीत आपल्याकडून कृत्य घडल्याची जाणीव तात्काळ होते आणि मनात खेद निर्माण होतो. ज्या कारणासाठी जीवन जगायचं ध्येय ठरलं आहे त्या मार्गात क्रोधाचा हा अडसर नकोसा वाटतो, पण त्या क्रोधापासून सुटकाही होत नाही! समर्थानी ‘षड्रिपुनिरूपण’ या लघुप्रकरणात क्रोध निरूपणाचा समारोप करताना सांगितलं आहे की, ‘‘भल्यानें कोप सांडावा शांतीनें असतां बरें। क्षुल्लकें कोप पाळावा भल्याचें काम तों नव्हे।।’’ भल्याने कोप सांडावा! म्हणजे आपण भले आहोत, असा गैरसमज नको.. पण ज्याला भल्या मार्गावर, अध्यात्माच्या या व्यापक मार्गावर चालायचं आहे आणि खरं भलेपण प्राप्त करायचं आहे त्यानं तरी कोप सांडला पाहिजे. त्यानं शांतीनं राहण्याचा प्रयत्न करावा. श्रीमहाराज सांगत ना, त्याप्रमाणे असलेली शांती निदान बिघडवू तरी नये! आणि पुन्हा याचं मूळ कामना विकारातच आहे बरं का.. आपल्या मनासारखं होत नाही म्हणून आपल्याला राग येतो. अगदी लहानसहान गोष्टींतही आपल्याच मनासारखं व्हावं, असा आपला हट्टाग्रह असतो. तेव्हा आधी दररोजच्या जगण्यात निदान लहानसहान गोष्टींतलं आपलं गुंतणं, त्यात आपल्याच मनासारखं व्हावं, हा हट्टाग्रह आटोक्यात आला पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत त्याप्रमाणे, आपल्या घरात पाहुण्यासारखं राहाता आलं पाहिजे! आपण पाहुणे म्हणून दुसऱ्याकडे जातो तेव्हा त्या घरात इकडचं कपाट तिकडे हलवलं म्हणून रागावतो का? आपल्या घरात मात्र आपल्याला न विचारता एखादी गोष्ट केली की आपण उसळतो! दुसऱ्याच्या घरी सरबराईत एखादी गोष्ट कमी झाली तर आपण त्यांनाच समजुतीच्या स्वरात सांगतो, ‘‘अहो जाऊदे, त्यात काय एवढं?’’ पण आपल्या घरी? बरं आपण आपल्या मनाची काळजी घेतो, पण दुसऱ्याच्या मनाची आणि मताची मात्र फिकीरही बाळगत नाही. उलट दुसऱ्याचं मन आणि मत आपल्याविरुद्ध असेल, तर आपल्याला रागच येतो! – चैतन्य प्रेम

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 9 शेयर

*लोकसत्ता :: मनोयोग ४७. षट्विकारदर्शन -- क्रोध-२ :: ०९ मार्च * नको रे मना क्रोध हा खेदकारी! क्रोध हा मनाला खेदाच्या खाईत ढकलणारा आहे. या क्रोधाची व्याप्ती फार मोठी आहे. क्रोध आणि भय या माणसाच्या दोन उपजत मनोभावना आहेत. त्यांचं बीज माणसाच्या मेंदूतच असतं. ‘भाविदडी’त मानसशास्त्राच्या अंगानं या भयाचा आणि क्रोधाचा विचार केला होता. थोडा विचार केला की आपल्याही लक्षात येईल की, कोणतीही मनोभावना उत्पन्न झाली की काही आंतरिक बदल निश्चितच घडतात. हे बदल देहाच्या पातळीवरही असतात. मनोभावना उसळताच शरीरही त्या भावनेला पूरक अशी, अनुरूप अशी स्वयंसज्जता निर्माण करतं. भय आणि क्रोध या दोन्ही मनोवेगांच्या वेळी शरीरात जे बदल घडतात त्यात साम्य असतं. क्रोधाविष्ट माणसाचा चेहरा पालटतो आणि त्याच्या डोळ्यांतूनही क्रोध फाकत असतो, हे तर दिसतंच. त्याबरोबरच आत काय क्रिया घडते? माणूस क्रोधायमान होतो तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. स्नायूंमधल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावू लागतात. यकृतात साठलेली साखर बाहेर पडू लागते. काही अंतस्र्रावी ग्रंथींमधील प्रथिनयुक्त घटकांचं प्रमाण वेगानं वाढू लागतं. स्नायूंमधील रक्तवाहिन्या प्रसरण पावत असतानाच त्वचेवरील रक्तवाहिन्या मात्र आकुंचन पावत असतात! काय योजना आहे पाहा! क्रोधाच्या क्षणी मेंदूला निर्णय फार वेगानं घ्यावा लागतो त्यामुळे यकृतातील साखर मेंदूकडे, तर कृतीसाठी स्नायूंना तात्काळ बळ मिळावं यासाठी रक्तपुरवठा स्नायूंकडे सुरू होतो. स्नायूंना रक्तपुरवठा वेगानं सुरू राहावा म्हणून स्नायूंमधील रक्तवाहिन्या प्रसरण पावत असतानाच जर क्रोधाच्या क्षणी शरीरावर आघात झालाच तर रक्तस्त्राव कमी व्हावा, यासाठी त्वचेवरील रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात! भय आणि क्रोध या दोन्ही मनोवेगांच्या वेळी शरीर अशी विलक्षण सज्जता बाळगतं! आता विचार करा, खऱ्या अटीतटीच्या क्षणासाठी ही जी एवढी आंतरिक तयारी, सज्जता शरीर वेगानं निर्माण करतं ती सदोदित करण्याची पाळी शरीरावर ओढवली तर काय होईल? कितीही झालं तरी शरीराच्या क्षमतांनाही मर्यादा आहेच. त्यांच्यावर सदोदितचा ताण निर्माण करणं म्हणजे त्या सज्जतेच्या प्रक्रियेलाच क्षीण करणं आहे. त्याचा शरीरावरही विपरीत परिणाम होऊ लागेल, यातही शंका नाही. म्हणूनच सदोदित क्रोधायमान होणं, ही स्थिती देहाच्या दृष्टीनंही चांगली नाही. त्यासाठीच अध्यात्मही क्रोधावर ताबा मिळवायला सांगतं. समर्थही म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी! ‘आचरण योग’ या ग्रंथात या क्रोधाचे चार प्रकार य. श्री. ताम्हनकर यांनी सांगितले आहेत. शीघ्रकोपी, दीर्घकोपी, बलहीनकोपी आणि सुप्तकोपी, असे ते चार प्रकार आहेत. राग उसळायला ज्यांना क्षुल्लक कारणही पुरतं ते शीघ्रकोपी, पण हे लोक बरे कारण त्यांचा राग जसा क्षणार्धात उसळतो तसाच वेगानं शांतही होतो. मनात मळमळ साचत नाही. अर्थात सतत रागावणं हे चांगलं नव्हेच! दीर्घकोपी हे वारंवार रागावत नाहीत, पण एकदा रागावले की त्यांचा राग प्रदीर्घ काळ टिकतो आणि त्यांच्या मनोवृत्तीवरही परिणाम करतो. देहाच्या दृष्टीनं अशक्त असलेले, बलहीनकोपी या गटात मोडतात. ते आपला राग दुसऱ्यावर काढू शकत नाहीत, म्हणून स्वत:वरच काढतात. स्वत:ला मारून घेतात. काही आपल्यापेक्षा बलहीन असलेल्यांवर हा राग काढतात. सुप्तकोपी हे एखाद्या ज्वालामुखीसारखे थंड असतात. त्यांचा राग त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा आचरणातून जाणवतही नाही. ज्वालामुखी जसा अचानक उसळावा आणि सर्व भवताल त्यात बेचिराख होत जावा तसा यांच्या अंतर्मनातला खदखदता राग अचानक उफाळतो आणि इतरांबरोबरच स्वत:चाही घात करतो. आपण या चारपैकी कोणत्या गटात आहोत? – चैतन्य प्रेम

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर

*लोकसत्ता :: मनोयोग ४९. षट्विकारदर्शन - क्रोध-४ :: ११ मार्च* क्रोधनिरूपणाच्या अखेरीस भल्याने, म्हणजे भल्या मार्गावरून चालू पाहणाऱ्यानं कोप सांडावा आणि शांतीनं राहावं, असं समर्थ सांगतात. पुढे ते म्हणतात, ‘‘क्षुल्लकें कोप पाळावा भल्याचें काम तों नव्हे।।’’ आता क्षुल्लक म्हणजे कोण? तर ज्याचं जीवन दिशाहीन आहे किंवा त्या जीवनाला काही दिशा असावी, असंही त्याला जाणवत नाही, ज्याचं जीवन क्षुद्र विकारवासनांच्या पूर्तीसाठीच सरत आहे, त्यानं हवं तर कोप पाळावा! हा पाळावा शब्दही फार खुबीदार आहे. प्रत्यक्षात क्रोधच माणसाला पाळू लागतो. एखादं पाळीव कुत्रं जस मालकासाठी आणि परक्याच्या विरोधात सहज भुंकतं तसा क्रोधानं पाळलेला माणूस त्या क्रोधाच्या आधारावर दुसऱ्याचं मन दुखावेल असं बोलू आणि वागू लागतो. समर्थ म्हणतात, ज्याला जीवन व्यापक ध्येयाच्या पूर्तीसाठी जगायचं आहे त्यानं क्रोधाच्या आहारी जाऊन वेळ आणि श्रम, शारीरिक आणि मानसिक शक्ती वाया घालवू नये. ते त्याचं कामच नाही. आता इथे एक प्रश्न उपस्थित होईल की, व्यापक जीवनध्येय म्हणजे नेमकं कोणतं? तर हा सर्व बोध साधकासाठी असल्यानं हे व्यापक जीवनध्येय आध्यात्मिकच अध्याहृत आहे. संकुचित जगण्याची रीत बदलून व्यापक होत जायचं आहे. मनानं, वृत्तीनं, भावनेनं, विचारानं आणि अगदी कल्पनेनंसुद्धा! मग कुणाच्या मनात असाही प्रश्न येईल की, माणूस काही एकटाच जगत नाही. तो समाजात जगतो. समर्थानीही त्यांच्या काळी समाजाला जे आवश्यक होतं त्याकडेही दुर्लक्ष केलं नाही. त्यासाठी त्यांनी बलोपासनेवर, राजकारणावर, समाजकारणावर भर दिला होता. मग अशा सामाजिक वा राजकीय व्यापक ध्येयासाठी कधीकधी क्रोध आवश्यक किंवा अनिवार्य नसतो का? प्रश्न मोठा चपखल आणि चलाख आहे. सामाजिक वा राजकीय व्यापक ध्येयासाठी ज्यांना जगायचं आहे त्यांनी क्रोधाचा वापर एक साधन म्हणून अनिवार्य असेल तरच अवश्य करावा. अन्यायाविरोधात सामाजिक क्रोध संघटित करणं आणि त्यातून परिवर्तनाला चालना देणं, हादेखील मार्ग आहे. त्याचवेळी साधन हे साध्यापुरतं असतं, हे मात्र विसरू नये. क्रोध हाच राजकारणाचा, समाजकारणाचा पाया होऊ नये. पण खरं सांगायचं तर राजकारणाला किंवा समाजाला वळण लावणारे तशी शक्ती घेऊनच जन्माला येतात. तेव्हा आपण केवळ साधकापुरता आणि त्याच्या साधनेपुरताच विचार करीत आहोत आणि त्या परिघातलं जे व्यापक आध्यात्मिक ध्येय आहे त्यापुरता विचार केला तर क्रोधाच्या सापळ्यातून सुटका झालीच पाहिजे, यात शंका नाही. तर क्रोध हा भल्याचे काम नसेल तर तो सोडण्यासाठी आपल्यातला क्षुल्लकपणा सोडावा लागेल! क्षुल्लक इच्छांमध्ये अडकणं आणि त्यांची पूर्ती झाली नाही तर क्रोधायमान होणं थांबलं पाहिजे. क्षुल्लक मनोवेगांच्या आहारी जाऊन वाहावत जाणं आणि त्या मनोवेगांच्या प्रतिकूल गोष्टी घडल्या तर रागाच्या आहारी जाणं थांबलं पाहिजे. क्षुल्लक कारणावरून चिडणं, क्षुल्लक प्रसंगाला नको तितकं महत्त्व देऊन आपली मानसिक आणि वैचारिक पातळी घसरवणं थांबवलं पाहिजे. जगण्यातले सर्व क्षुल्लक हेतू, क्षुल्लक सोस, क्षुल्लक ओढी मावळल्या पाहिजेत. जगण्याची रीत जर क्षुल्लक असेल तर जगणं भव्य कसं होईल? जगण्याचं ध्येयच जर क्षुल्लक, संकुचित असेल तर जगणं व्यापक कसं होईल? तेव्हा क्षुल्लक भावना, क्षुल्लक कल्पना, क्षुल्लक वासना, क्षुल्लक विचार, क्षुल्लक इच्छा आणि क्षुल्लक संकल्पांच्या आहारी जाण्याची आणि त्यानुसार वाहावत जाण्याची आपली सवय आपल्याला प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक बदलावी लागेल. -चैतन्य प्रेम

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर

*लोकसत्ता :: मनोयोग ४१. षट्विकारदर्शन - १ :: २९ फेब्रुवारी * ४१. षट्विकारदर्शन : १ :: संकल्प आणि विकल्पाची चर्चा सुरू असतानाच एका साधकानं श्रीगोंदवलेकर महाराज संकल्प आणि विकल्पाची चर्चा सुरू असतानाच एका साधकानं श्रीगोंदवलेकर महाराज यांनी ‘मानसपूजा’ या स्तोत्रातील रूपकाची आठवण करून दिली. श्रीरामचंद्रांची मानसपूजा कशी करायची, हे श्रीमहाराजांनी त्यात सांगितलं आहे आणि त्यातली एक ओवी अशी आहे : ‘‘इंद्रियांचा तांबूल जाण। षड्रीपूंची दक्षिणा सुवर्ण। संकल्प विकल्प धनुष्यबाण। रामाहाती दिधला।।’’ इथे धनुष्य जसा हातातच राहातो, तसा संकल्प दृढ धरावा आणि बाण जसा सोडून दिला जातो तसा विकल्प सोडून द्यावा, असा अर्थ काहीजणांना वाटतो. प्रत्यक्षात तसा अर्थ वाटत नाही. याचं कारण रामाचा बाण हासुद्धा लक्ष्यावरच असायचा. बाण हातातून नुसता सोडून दिला जात नाही, तो लक्ष्यावरच सोडला जातो. मग इथे काय अर्थ असावा? तर इंद्रियांच्या योगानं विषयरसाची जी गोडी लागली आहे ती आणि षट्रीपूंची म्हणजे काम, क्रोध, लोभ-मोह, मद, मत्सर, दंभ यांची सुवर्ण दक्षिणा रामाला अर्पण करावी. आता सहा विकारांना सोनं का म्हंटलंय? तर हेच विकार भगवंताकडेही वळवता येतात म्हणून! केवळ भगवंताची कामना धरावी (काम), साधनेसाठी समर्पण होत नसल्याचा खेद असावा (क्रोध), उपासनेची ओढ असावी व तिच्याशिवाय अन्य कशाचा प्रभाव मनावर नसावा (लोभ व मोह).. आता मद आणि मत्सराचं रूपांतर फार सूक्ष्म आहे. ‘मी कोण आहे’ याचा मद उरू नये, तर ‘मी कुणाचा आहे’ या जाणिवेनं सर्व गोष्टींमधलं गुंतणं तुच्छवत् वाटावं हा रूपांतरित मद आहे आणि प्रभूंचे किती अनन्य भक्त होऊन गेले, मी तसा का होत नाही, हे ‘तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो,’ असं मत्सराचं रूपांतर व्हावं. तर असे रूपांतरित, जणू विरक्तीच्या अग्नीनं झळालेलं सुवर्ण दक्षिणा म्हणून द्यायचं आहे. मग काय म्हणतात? तर आजवर भौतिक संकल्पाचं धनुष्य आणि त्यांच्या पूर्तीसाठी धडपडतानाच विफल ठरणारे विकल्पवत बाण, हे दोन्हीही प्रभूंनाच अर्पण करावं आणि प्रभूंच्या हातीच धनुष्य-बाण द्यावा, कर्तेपणा द्यावा! मग माझ्या विकल्पांवर तेच बाण सोडतील! श्रीमहाराजांच्या ‘मानसपूजे’तील हे चरण आपल्या पुढील चर्चेला अधिक प्रवाहित करणारे आहेत कारण सहाव्या श्लोकाच्या निमित्तानं ‘षट्विकारदर्शना’चा प्रारंभ होत आहे! हे सहा विकार आपण आधीच पाहिले ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि दंभ. त्यांचा उल्लेख पुढील सहाव्या श्लोकांत आहे. हा श्लोक असा : नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नानाविकारी।। नको रे मना सर्वथा अंगिकारूं। नको रे मना मत्सरू दंभभारू।। ६।। आता हा श्लोक वाचला तर वाटेल की यात केवळ काम, क्रोध आणि मत्सर यांचाच स्पष्ट उल्लेख आहे. पण तसं नाही, लोभ आणि मोह हे कामनेतूनच उत्पन्न होत असल्याने त्यांचा संकेत ‘काम नानाविकारी’ या शब्दांत आहे आणि ‘नको रे मना सर्वथा अंगिकारूं।’ हा जो तिसरा चरण आहे, तो प्रत्यक्षात ‘नको रे मदा सर्वथा अंगिकारूं।’ असा असला पाहिजे. तेव्हा या श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ असा की, ‘‘हे मना, काम म्हणजे कामना या घातक विकारांतूनच क्रोध, लोभ, मोह आदी नानाविकार उत्पन्न होतात. क्रोध हा अखेरीस खेदच उत्पन्न करतो. त्यामुळे या काम, क्रोध, लोभ, मोहाचा त्याग कर. मद म्हणजे अहंभावानं जगणं सोडून दे. तो मद अंगिकारू नकोस, म्हणजेच तुझ्या अंगात तो साकारू देऊ नकोस. दुसऱ्याविषयी तुच्छता आणि स्वत:विषयी अवास्तव दंभभाव जोपासणाऱ्या मत्सराचाही त्याग कर.’’ आता या श्लोकाचा सार्वत्रिक अर्थ आणि मननार्थ यात भेद नाही. तरी त्याचं मनन मात्र आवश्यक आहे! तिकडे आता वळू. -चैतन्य प्रेम

+11 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 10 शेयर