भागवत

*लोकसत्ता :: एकात्मयोग ५९. मरणाचं वारं :: २५ मार्च २०१९* गेल्या भागात शेवटच्या ओळीत एक महत्त्वाची चूक घडली आहे ती प्रथम दुरुस्त करू. कृष्णाच्या सांगण्यावरून सर्व ऋषीमुनी पिंडारक तीर्थावर गेले आणि इकडे उन्मत्त झालेल्या यदुकुमारांच्या मनात, जे कुणी तपस्वी मागे थांबले होते, त्यांची खिल्ली उडवायची इच्छा उत्पन्न झाली, असं म्हटलं होतं. प्रत्यक्षात हे यदुकुमारच कंदुक खेळत, एकमेकांना चेंडूनं मारत, मार चुकवत आपल्याच नादात पिंडारक क्षेत्रापर्यंत पोहोचले! हे क्षेत्र द्वारकेपासून काही मैलांवर आहे. तर तिथं ते गेले आणि ऋषींना पाहून त्यांची गंमत करायची आत्मघातकी इच्छा या कुमारांच्या मनात उत्पन्न झाली! म्हणजे संत संगात समस्त भय ओसरतं, पण त्याच संत सहवासात जाऊनही ज्यांना त्या सहवासाचं मोल उमगत नाही, ते त्या सहवासातही देहबुद्धीच जोपासतात आणि मनाच्या आवडीनुसारच वागून आपलाच घात करून घेत असतात. तीच गत या यदुकुमारांची होती. त्यांच्या मनात आलं, की थोडी या ऋषींची गंमत करावी. एकनाथ सांगतात, ‘‘पहिलेच श्रीमदें उद्धट। त्यावरी मांडिलें कपट। सांबास देऊनि स्त्रीनट। अतिवरिष्ठ बाणला।। ३४७।।’’ आधीच सत्ता आणि संपत्तीच्या मदानं यदुकुमार उन्मत्त झाले होते. त्यात त्यांच्या मनात कपटभावना जागृत झाली होती. त्यांनी जांबवतीचा पुत्र सांब याला स्त्रीवेष देऊन खूप नटवलं. त्याचे डोळे पाणीदार होते आणि तो होताही थोडा नाजूक. त्यात अभिनयाची कलाही त्याला अवगत होती. त्यामुळे तो स्त्रीवेषात हंसगतीनं चालू लागला. त्याच्या पोटाला यदुकुमारांनी कपडे आणि चिंध्या बांधल्या होत्या. त्यायोगे गर्भवती स्त्रीचं सोंग तो वठवीत होता. सख्यांच्या खांद्यावर हात टेकवून तो सांब मंदगतीनं चालत चालत जिथं ऋषी तपाचरणासाठी बसले होते तिथं आला. सर्व यदुकुमारही मग ऋषींसमोर मोठय़ा विनयानं गेले आणि म्हणाले की, ‘‘पहा, ही स्त्री लाजाळू असल्यानं आपल्यासमोर येण्यास घाबरत आहे. तिची इच्छा आहे की तिला पुत्र व्हावा. तर हे ऋषीवर तिला तसा आशीर्वाद द्या!’’ यदुकुमारांचं हे धाडस पाहून नारद ऋषींपुढे नाचू लागले! आता यादव वंशाची अखेर जवळ आली आहे, हे त्यांनी जाणलं आणि यामागची कृष्णलीला उमगूनही ते मुग्ध झाले.  शुकदेव परीक्षितीला सांगत आहेत की, जणू काळगतीचेच वारे वाहू लागले होते ते वारं डोक्यात गेल्यानं ते ऋषींशी कपट करीत होते! (एकें परीक्षिति नृपवरा। यापरी यादवकुमरां। निधनाचा भरला वारा। तेणें ते ऋषीश्वरां छळूं गेले।।३६६।।). हे कपट जाणून ते ऋषीश्वर कोपले आणि त्यांच्या मुखातून शापयुक्त वज्रभाषण पडलं. ते म्हणाले, ‘‘अरे हे प्रसवेल जें बाळ। तें होईल सकळकुळा काळ। निखळ लोहाचें मुसळ। देखाल सकळ मंदभाग्यें।। ३६८।।’’ अरे यदुकुमारांनो, ही स्त्री ज्या बाळाला जन्म देणार आहे ना, ते तुमच्या कुळाचा काळ ठरणार आहे! तुमच्या मंदभाग्यामुळे या गर्भाचं थेट लोखंडी मुसळ झालेलं तुम्हाला पाहावं लागणार आहे!! ऋषींची ही शापवाणी ऐकताच यदुकुमार खडबडून जागे झाले. भानावर आले. त्याच पावली त्या स्त्रीला घेऊन परतले आणि एकांतात जाऊन पाहातात तो जी वस्त्रं, चिंध्या गुंडाळल्या होत्या त्यांच्या जागी एक लोखंडी मुसळ दिसू लागलं. मग सगळ्यांनी उग्रसेनांकडे धाव घेतली. गुप्त सभा भरली आणि त्यात खल सुरू झाला की या मुसळाचं काय करायचं? काळाचं वारं खरंच जोरात होतं, म्हणूनच कृष्णापासून लपवून हा खल करण्याची विपरीत बुद्धी यादवांच्या मनात आली होती! - चैतन्य प्रेम

+18 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

*लोकसत्ता :: एकात्मयोग ३०८. जाळं :: २३ मार्च २०२०* पण मुळात आपण गुण किंवा सद्गुण म्हणून जे मानतो, ते आपल्या दुराग्रहाचंच रूप असू शकते. संत एकनाथ महाराज यांच्या ‘एकनाथी भागवत’ या ग्रंथात यदुराजा आणि अवधूत योग्याच्या संवादातून चराचरांतलं गुरूत्व उलगडत आहे. पृथ्वी या पहिल्या गुरूकडून आपण शांती, समत्व आणि दातृत्व हे तीन गुण कसे ग्रहण केले, हे अवधूतानं सांगितलं. आता वायू या दुसऱ्या गुरूकडून समदृष्टी आणि अलिप्तपणा कसा शिकलो, हे अवधूत सांगत आहे. तो म्हणतो, ‘‘वायु सर्वातें स्पशरेनि जाये। परी अडकला कोठें न राहे। तैसें विषय सेवितां पाहें। आसक्तु नव्हे योगिया।।४२४।।’’ (अध्याय सातवा). वायू सर्वत्र स्पर्श करतो, पण अडकत कुठेच नाही! तो सरोवरावर तरंग उमटवतो, तसाच उकिरडय़ावरचा पालापाचोळाही उडवतो. पण म्हणून तो सरोवराशी वा उकिरडय़ाशी एकरूप होत नाही! सतत वाहतं राहणं, हाच त्याचा स्वभाव आहे! तसं योगी वृत्तीच्या साधकाचं मन कुठे अडकून पडत नाही. तो प्रपंचात दिसतो, प्रपंचातली कर्तव्यं पार पाडताना दिसतो, पण मनानं तो प्रपंचाशी एकरूप नसतो. प्रपंचात आसक्त नसतो. अवधूत म्हणतो, ‘‘असोनि इंद्रियांचेनि मेळें। तो विषयांमाजीं जरी खेळे। तरी गुणदोष आसक्तिमेळें। बोधू न मळे तयाचा।।४२५।।’’ सर्वसामान्य माणसाप्रमाणेच त्यालाही सर्व इंद्रियांनी युक्त असा देह लाभलेला असतो (‘असोनि इंद्रियांचेनि मेळें’). सर्वसामान्य माणसाप्रमाणेच तो डोळ्यांनी पाहताना, कानांनी ऐकताना, मुखानं बोलताना, जिव्हेनं रसग्रहण करताना, हाता-पायांनी कर्म करतानाही दिसतो (‘तो विषयांमाजीं जरी खेळे’). तरीही सामान्य माणसाप्रमाणे तो गुण-दोषांच्या आसक्तीनं बद्ध होत नाही, त्या आसक्तीत अडकून त्याच्या अंत:करणातला सद्गुरू बोध ‘मी’ भावानं मलीन होत नाही, मळत नाही (‘तरी गुणदोष आसक्तिमेळें। बोधू न मळे तयाचा।।’). आता कुणाला वाटेल की, दोषांत माणूस आसक्त असणं वाईट आहे, हे समजू शकतं. पण गुणांची आसक्ती किंवा आग्रह असण्यात काय गैर आहे? पण मुळात आपण गुण किंवा सद्गुण म्हणून जे मानतो, ते आपल्या दुराग्रहाचंच रूप असू शकते. हट्टाग्रहाला वा दुराग्रहाला आपण निर्धारीपणा मानू शकतो, हेकेखोरपणाला आपण सत्याग्रही मानू शकतो, उधळपट्टीला आपण उदारता मानू शकतो.. तेव्हा आपले सद्गुण हे खरेच सद्गुण आहेत की दुर्गुण आहेत, हेच आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे अशा सद्गुणांच्या आसक्तीतही वास्तवाचं भान लोपतंच. अर्थात, अंत:करणात थोडाफार शिरलेला सद्गुरू बोधही मलीन होतो. योगी मात्र इंद्रियांच्या संगतीत राहून विषयात वावरताना जरी दिसत असला, तरी गुण वा दोषांनी तो कधीच लिप्त होत नसल्यानं त्याचं आत्मज्ञान कधीही मलीन होत नाही. सगळ्यात असूनही योगी कशातही कसा अडकत नाही, हे स्पष्ट करताना एकनाथ महाराज आणखी एक बहारीचं रूपक वापरतात. ते म्हणतात, ‘‘जैसें वारेंनि जाळ उडे। परी जाळी वारा नातुडे। तेवीं भोग भोगिता गाढे। भोगी नातुडे योगिया।।४२७।।’’ वाऱ्यानं जाळं उडताना दिसतं, पण वारा त्या जाळ्यात अडकतो का? तर नाही! तसा योगीही प्रपंचजाळ्यात दिसतो, पण त्या जाळ्यात तो अडकलेला नसतो! तेव्हा वायू या दुसऱ्या गुरूकडून आपण काय काय शिकलो, हे अवधूतानं सांगितलं. या वायुतत्त्वानंतर आकाशतत्त्वाकडून आपण काय शिकलो, हे अवधूत आता यदुराजाला सांगणार आहे. अर्थात, पृथ्वी आणि वायूनंतरचा आकाश हा त्याचा तिसरा गुरू आहे! - चैतन्य प्रेम

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

*लोकसत्ता :: एकात्मयोग ३०७. ऐक्यता साधावी चतुरी! :: २० मार्च २०२०* अंतरंगातील त्याची सद्गुरूमयता, सद्गुरू शरणता, सद्गुरू भावमयता कधीच भंगत नाही.  संत एकनाथ महाराज यांच्या ‘एकनाथी भागवत’ या ग्रंथाच्या आधारे आपलं हे चिंतन गेले सव्वा वर्ष सुरू आहे. सद्गुरूशी ऐक्यभाव कसा स्थापित होऊ  शकेल, याचा ‘एकनाथी भागवता’च्या बोधप्रकाशात वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यात यदु-अवधूत संवादाच्या निमित्तानं आपण चराचरांतील गुरुतत्त्वाच्या दर्शनापासून एका सद्गुरूपर्यंत पोहोचविणारा आणि त्याच्याशी ऐक्यता स्थापित करणारा मार्ग जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर गेल्या भागात म्हटलं की, योगी चातुर्यानं ऐक्य साधतो. (‘ऐक्यता साधावी चतुरीं। ते वायूच्या ऐसी दोहींपरी। बाह्य़ आणि अंतरीं। ऐक्यकरीं वर्तावें।।’). आता हे ऐक्य तो कोणाशी साधतो, हे पटकन लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं की, तो बाह्य़ जगाशी ऐक्य साधतो असंच इथं अभिप्रेत असावं. पण हे ऐक्य दुहेरी आहे! म्हणजे बाह्य़ जगाशी तर तो ऐक्यभाव दाखवतोच, पण खरं आणि साधक जीवनातील महत्त्वाचं ऐक्य वेगळंच आहे. हे आंतरिक, सूक्ष्म ऐक्य आहे ते परमात्म्याशी, म्हणजेच परमात्म्याशी एकरूप झालेल्या सद्गुरूशी! बाहेरच्या जगात वावरतानाही सद्गुरूशी जी आंतरिक ऐक्यता असते, ती योगी विसरत नाही! आता सद्गुरूशी आंतरिक ऐक्यता असते म्हणजे तरी काय? तर ती त्यांच्या बोधविचाराशी ऐक्यता असते. जो त्यांचा विचार तोच माझा विचार, जो त्यांचा निर्णय तोच माझा निर्णय, असं ते आंतरिक ऐक्य असतं. त्यामुळे जगात वावरतानाही योगी जगात गुंतत नाही. जगाकडून अपेक्षा बाळगत नाही. त्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी लाचारीनं ताटकळत वा तळमळत नाही. जगात आसक्त होत नाही. जगाशी तो समत्वानं वागतो; पण मायामोहाच्या गाळात रुतवणारं ममत्व जोपासत नाही. जगाप्रतिची सर्व कर्तव्यं तो पार पाडतो; पण त्या कर्तव्याच्या बदल्यात जगाकडून मोबदल्याची अपेक्षा बाळगत नाही. अंतरंगातील त्याची सद्गुरूमयता, सद्गुरू शरणता, सद्गुरू भावमयता कधीच भंगत नाही. गंमत अशी की, ही गोष्ट तो जगाला कळूही देत नाही! बाहेरून जगातच वावरत असताना, जगरहाटीनुसारची कामं करीत असतानाही सद्गुरू ऐक्यतेचा दोर तुटत नाही आणि म्हणूनच ‘ऐक्यता साधावी चतुरीं’ हे सूत्र त्याच्या जगण्यात लपलेलं असतं. अर्थात, जगात वावरूनही जगाला न चिकटण्याचा हा गुणही तो वायूकडूनच शिकतो. अवधूत सांगतो, ‘‘वायु सर्वातें स्पशरेनि जाये। परी अडकला कोठें न राहे। तैसें विषय सेवितां पाहें। आसक्तु नव्हे योगिया।।४२४।।’’ वायू सर्वत्र स्पर्श करतो, पण अडकत कुठेच नाही! तसा योगी विषय सेवन करतानाही दिसतो, पण त्या विषयभोगात आसक्त कधीच होत नाही. मग अवधूत म्हणतो, ‘‘असोनि इंद्रियांचेनि मेळें। तो विषयांमाजीं जरी खेळे। तरी गुणदोषआसक्तिमेळें। बोधू न मळे तयाचा ।।४२५।।’’ योगी इंद्रियांच्या संगतीत राहून विषयात वावरताना जरी दिसत असला, तरी गुण व दोष पाहण्याच्या वृत्तीनं त्याचं आत्मज्ञान कधीही मलिन होत नाही. म्हणजे तो डोळ्यांनी पाहतो; पण अमुकच एखादी गोष्ट पाहावी, या भावनेत अडकून त्याचं चित्त मलिन होत नाही.

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 8 शेयर