बोध:

*लोकसत्ता :: तत्वबोध :: आध्यात्म आणि कर्तव्य :: ६ एप्रिल २०२०* स्वत:ला आध्यात्मिक मानत असलेल्या माणसाच्या मनातही जगताना अनेक टप्प्यांवर अनेक प्रश्न उमटतात. जगात साथीच्या आजारासारखं एखादं संकट ओढवतं, यादवी युद्धासारखी परिस्थिती उद्भवते, तेव्हा स्वत:ला आध्यात्मिक न मानणारी माणसं स्वत:ला आध्यात्मिक मानत असलेल्या माणसांकडे अधिकच टोकदारपणे पाहतात! घरातल्या घरातसुद्धा हे घडतं म्हणतात, बरं का! मग- ‘काय म्हणतोय तो तुमचा देव? आता कुठाय?’ असे प्रश्न नजरेतूनही विचारले जातात! स्वत:ला आध्यात्मिक मानत असलेल्या माणसाच्या मनातही जगताना अनेक टप्प्यांवर अनेक प्रश्न उमटतात. त्यातले बरेचसे प्रश्न हे जगण्यातील अडचणी आणि संकटांभोवती फिरणारे असतात. आपण देवाधर्माचं इतकं करतो, इतकी साधना करतो, तरी आपल्यावर संकट का यावं, आपल्या प्रगतीत अडथळे का यावेत, आपल्या वाटय़ाला आजारपण का यावं, असे प्रश्न मनात येतात. पण हेच तर जीवन आहे. ते सुख-दु:ख, यश-अपयश, लाभ-हानी, मान-अपमान, अनुकूलता-प्रतिकूलता, रोग-निरोगीपणा.. अशा दोन टोकांमध्येच हिंदकळत राहणार. अध्यात्त्माच्या मार्गावर वळलात तर तुमच्या वाटय़ाला सुखच सुख, यशच यश, लाभच लाभ, मानच मान, अनुकूलताच सतत येईल, असा कोणाही संताचा दावा नाही. पण या मार्गानं प्रामाणिक वाटचाल सुरू असेल, तर हा मार्ग जीवन खऱ्या अर्थानं जगण्याची कला शिकवतो. तो सुखानं, यशानं, लाभानं हुरळू देत नाही की दु:खानं, अपयशानं, हानीनं खचू देत नाही! मान आणि अपमान या दोन्ही परिस्थितींत मनाची समता कशी टिकवायची, याचा वस्तुपाठ तो देतो. अनुकूल परिस्थितीनं तो बेसावध होऊ देत नाही की प्रतिकूल परिस्थितीनं गांगरू देत नाही. रोगादि देहदु:खांकडेही तो धीरानं पाहतो आणि आवश्यक ते उपचार करीत असतानाही मनात बोधाचे संस्कारच जागवतो. काही जणांच्या मनात अध्यात्त्म आणि कर्तव्य, याबाबतही गोंधळ असतो. न्यूनगंड आणि भयगंडाचं सावट मनावर असतं. त्यात आपण प्रपंचापासून, पती वा पत्नीपासून दुरावणार आहोत आणि हा ‘त्याग’ परमार्थासाठी आवश्यकच आहे, असाही भ्रम त्यांच्या मनात असतो. प्रारब्ध आणि प्रापंचिक कर्तव्यांपासून पळ काढण्याचीही इच्छा असते. मात्र त्यांनी आंतरिक तपास आणि सखोल विचार केला पाहिजे. असं पाहा, आपल्या जीवनातली सुख-दु:खं ही आपल्याच कोणत्या ना कोणत्या कर्माची फळं असतात. मग ती र्कम या जन्मातील असोत वा मागील जन्मांतली असोत. त्या कर्मफळांनाच प्रारब्ध म्हणतात. हे प्रारब्ध स्वीकारावंच लागतं. आपण जगात आलो आहोत, विशिष्ट घरात, विशिष्ट परिस्थितीत जन्मलो आहोत. आपले जे जे नातेसंबंध आहेत, त्यांना आपण काही देणं लागतो आणि काही घेणं लागतो. मग ही देव-घेव प्रेमाची असू शकते वा द्वेषाचीही असू शकते. ती संपेपर्यंत प्रत्येक नात्याप्रतिचं कर्तव्यं संपत नाही आणि ते टाळणं चूकही असतं. तेव्हा प्रपंचातली कर्तव्यं परमार्थाच्या आड येत नाहीत. ती पार पाडत असतानाच नामस्मरण आणि मानसिक जपाची उपासना करता येते. त्या जोडीला संत-सत्पुरुषांचा बोध हा भगवद्गीतेसारखा वाचत जावा. तो आचरणात आणावा. पती वा पत्नी तसंच आपल्या घरची व सासरची मंडळी, यांच्याबाबतची कर्तव्यं प्रेमानं पार पाडावीत. ती कशी पार पाडावीत आणि प्रपंच करीत असताना परमार्थ कसा करावा, हे जाणण्यासाठी सत्पुरुषांच्या बोधाचं वाचन, मनन, चिंतन आणि आचरण हाच एकमात्र उपाय असतो. तो अमलात आणावा.

+35 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 20 शेयर

आपल्यात असणाऱ्या दोषावर दोष द्यायला हवा. इतरांना दोष देणं हाच सर्वांत मोठा दोष आहे. माणसं इतरांना आयुष्यभर दोष देत असतात. कधी देवाला, तर कधी नशिबाला. न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री आपल्यात असणाऱ्या दोषावर दोष द्यायला हवा. इतरांना दोष देणं हाच सर्वांत मोठा दोष आहे. माणसं इतरांना आयुष्यभर दोष देत असतात. कधी देवाला, तर कधी नशिबाला. दोन्ही न मानणारे समोरच्या व्यक्तीला दोष देतात. आपण अयोग्य आहोत याचं भानच त्यांना नसतं. जन्मजात जगाने आपले आईप्रमाणे लाडच करावेत किंबहुना इच्छा पूर्ण कराव्यात, सतत आपल्यालाच देत असावे, आपलीच मनधरणी करावी, फुलाप्रमाणे आपल्याला जपावे, आपल्याला कष्टच होऊ नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा भावनेने सामान्य भरलेले असतात. बालपण आणि किशोरावस्था आनंदात गेल्यामुळे तारुण्यात साध्या साध्या बाबी अडचणीच्या आणि दुःखाच्या वाटतात. चिडचिडेपण येतं. सर्वांचा राग येतो. आपल्यात योग्यता नसताना इतरांसह जगाला मूर्ख समजतो. दुःख होण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी हे एक महत्त्वाचे कारण आहे.  स्वतःतील उणिवा प्रथम आपल्याला समजल्या पाहिजेत, नंतर त्या अडचणीच्या आहेत अशा जाणवल्याही पाहिजेत. जर जाणवल्या तरच सुधारण्याची जाणीव यायला प्रारंभ होईल. दोषांची जाणीवच व्यक्तीला निर्दोष बनवते. आपल दोष आपल्याला समजणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. जर समजत असेल, तर आपला प्रवास ज्ञानाच्या दिशेने चालू आहे. नसेल समजत तर इतरांना दोष देणं चालू असतं. इतरांना दोषी ठरवून आपल्यात निर्दोषता येत नसते. आपण आपल्या दोषांवर रुसलं पाहिजे. माउलींची व्यंगात्मक अन्योक्ती समजली पाहिजे. माउली म्हणतात, 'महारोगी स्वतःच्या कुजलेल्या जखमांवर रुसत नाही, त्यावर बसणाऱ्या माश्यांवर रागवतो.' माउलींच्या शब्दांची जर चापट लागली, तर मनुष्य जागा होईल. सूत्रबद्ध अक्षरातून आशयाचं दर्शन व्हावं. अंगा न रुसे कोढिया। मासियां कोपें।। (ज्ञानेश्वरी १८-१३६) आपण निर्दोष आहोत का, याची समीक्षा आपल्याला करता यावी; इतरांत दोष असोत वा नसोत, आपण निर्दोष असल्यास आपल्याला आनंद मिळेल. आनंदी असणाऱ्याला दुःखदेखील दुःख देऊ शकत नाही. जर दुःख होत असेल, तर आपल्यात दोष आहेत. दुसऱ्यांना दोष देऊन आपले दोष जात नसतात. माशीवर रागावणं सोडा, आपल्यातील विकृतीवर इलाज करा. आपल्या उणिवांवर आपण रुसलं पाहिजे. त्याच्यापेक्षा मी चांगला आहे, अशी तुलना करू नका. निर्दोषता यावी, यासाठी प्रयत्नरत असलं पाहिजे. आपल्यातील दोष आपल्याला दुःख देत कमीपणा आणतात.

+11 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 15 शेयर

*लोकसत्ता :: चिंतनधारा ५०. फणस अन् कर्दळी :: १४ मार्च * फणसाचं झाड उंच असतं, तर कर्दळी पसरत जाणारी असते. सद्गुरू बोधानुसार जीवन जगत असलेला अनन्य भक्त पाहून सद्गुरूही त्या भक्तामध्ये अनेक गुणांचं बीजारोपण करतो. त्या भक्ताच्या जीवनात प्रेमाचं परिपोषण करतो. त्याच्या जीवनातून इतरांना प्रेरणा मिळेल, अशी त्याच्या जगण्याची घडण करतो. अर्थात त्या भक्ताला मात्र यातलं काहीच उमजत नसतं. त्याचं सगळं लक्ष केवळ सद्गुरूकडे केंद्रित असतं. त्याच्या अंत:करणातून जगाची आसक्ती अत्यंत क्षीण झाली असते. त्या साधकाच्या विरक्त दशेचं वर्णन आणि त्याच्या अंत:करणात उमलत असलेल्या, विकसित होत असलेल्या शुद्ध भावाचं वर्णन नाथ करतात, ‘फणस गंभीर कर्दळी दाट.’ फणसाच्या वृक्षाचं वर्णन नाथ एका शब्दात करतात ‘गंभीर’! एखाद्या विरक्ताप्रमाणे हा फणसाचा वृक्ष भासतो. नारळ, सुपारीसारख्या झाडांनासुद्धा त्याची सावली मिळेल, इतका तो विशाल आणि डौलदार असतो. या फणसाच्या झाडाचं सर्वात मोठं वैशिष्टय़ असं की त्याच्या खोडापासूनच फळं लगडलेली असतात. अगदी खोडापासून त्या फळांची सुरुवात होते. अगदी त्याचप्रमाणे या भक्तीमार्गावरून जो प्रामाणिकपणे खरी वाटचाल सुरू करतो त्याला पहिल्या पावलापासून अनुभव सुरू होतात! त्याच्या दृष्टीला सृष्टीतली प्रत्येक घडामोड ही भगवद्प्रेमाची जाणीव करून देणारी असते. डोळे मिटल्यावर दिसणारे रंग, दिसणारा प्रकाश किंवा ऐकू येणारा नाद यांनाच अनेकजण अनुभव मानतात किंवा त्या अनुभवावरून साधनेतली प्रगती जोखतात. पण जो प्रकाश काही क्षण दिसतो आणि मग लोपतो, जे रंग दिसतात आणि मग काही क्षणात विरतात, जो नाद ऐकू येतो आणि नंतर ओसरतो त्यांना कितीसं महत्त्व आहे? सदोदित टिकणारा अनुभव हाच खरा असतो, पण जी गोष्ट सदोदित असते तिची जाणीवच आपल्याला होत नाही. श्वास आणि उच्छ्वास सदोदित सुरू आहे, पण त्याची जाणीव आणि त्याचं महत्त्व नाही. अगदी त्याचप्रमाणे या संपूर्ण चराचरात नवनिर्मिती, अस्तित्व आणि अस्त अगदी क्रमानं सुरू आहे. विराट जीवनाचा हा जो अविरत प्रवाह सुरू आहे, त्यामागील परमतत्त्वाच्या जाणिवेनं साधकाच्या वृत्तीत एक विरक्त गांभीर्य विलसू लागतं. कुंडलिनी जागृतीच्या अंगानं विचार केला, तर फणसाच्या झाडाला जशी खोडापासूनच फळं असतात, तशीच मूलाधारापासूनच म्हणजे मूळ बैठकीपासूनच चक्रांची सुरुवात होते! या शक्तीच्या जागृतीनं आणि उन्नयनानं एक गांभीर्य विलसू लागतं. ध्यानस्थ योग्याप्रमाणेच हा ‘फणस गंभीर’ भासतो! पुढे आहे ‘कर्दळी दाट’. फणसाचं झाड उंच असतं, तर कर्दळी पसरत जाणारी असते. तिच्या कंदातूनच कंद फुटत जातात. अगदी त्याप्रमाणे आंतरिक आनंदस्थितीचा ओझरता अनुभव या ध्यानस्थाला येऊ लागतो आणि त्या क्षीणशा आनंदानुभवातूनही अष्टसात्त्विक भावांच्या कळ्या जणू जन्मू लागतात. कर्दळी आणि केळी यांच्यात फरक आहे, पण काही ठिकाणी केळीच्याच झाडाला कर्दळी (कदली) संबोधलं आहे. कर्दळीची उंची कमी असते, पण तिला पावित्र्याचं विशेष स्थान असतं. थोडक्यात शुद्ध भक्तीनं हा अनन्य भक्त जसजसा विरक्त होतो तसतसं त्याच्या सर्व जीवनव्यवहारात एक सहज पावित्र्य विलसू लागतं. कर्दळीची फुलं ही अर्धोन्मीलित भासतात. म्हणजेच पूर्ण उघडलेलीही नाहीत की पूर्ण मिटलेलीही नाहीत. कुंडलिनी जागृतीची ही प्रारंभिक स्थिती आहे. चक्रं उमलू लागली आहेत, पण पूर्ण उमललेली नाहीत. याच टप्प्यावर ‘सारंगधर’ अवतीर्ण होतो!

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 8 शेयर