दासबोध।।

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १३-नामरुप,समास ८-कर्तानिरूपण,निरूपण क्रमांक ५१२ – भाग ४ मधील सार.* दासबोधातील तेराव्या दशकातील आठव्या समासाच्या आंतिम टप्प्यामध्ये समर्थ या विश्वाचे कर्तेपण या प्रश्नाचा खरा गाभा समजावून सांगताना म्हणतात की.... *लटिक्याचा कर्ता कोण ! हें पुसणेंचि अप्रमाण !* *म्हणोनि हेंचि प्रमाण ! जें स्वभावेंचि जालें !!१३.८.३१.!!* समर्थांनी ज्ञानदशकामध्ये या सृष्टीविषयी जो वेगवेगळ्या प्रकारे उहापोह केला त्यामध्ये एका प्रसिद्ध ओवीत त्यांनी म्हटले अरे जें जालेंचि नाहीं ! त्याची वार्ता पुससिं कांही ! ही सृष्टी झाली, या सृष्टीमध्ये मी झालो, या सृष्टीत वेगवेगळी कर्म झाली त्या आधारे या विश्वात कार्यकारणभाव प्रस्थापित झाला हे मी ज्याक्षणी माझ्या अंतःकरणात घट्ट धरतो त्यावेळेला मला या सर्व कार्यकारणभावाचा कर्ता कोण आहे हा प्रश्न पडतो. सामान्य जीवाला या विश्वाचा कर्ता कोण आहे ही भूमिका वारंवार या कार्यकारणभावाच्या आधारे शोधावी लागते, परंतु संतांनी सृष्टीकडे आत्मज्ञानाच्या दृष्टीकोनातून बघितले, ज्यांनी या विश्वाचा खरा कर्ता निश्चयात्मक भूमिकेतून बघितला तेच आपल्याला या सृष्टीचे खरे स्वरूप समजावून सांगू शकतात. समर्थ म्हणतात की जे लटके आहे, जे खऱ्या अर्थाने अस्तित्वातच नाही त्याचा कर्ता कोण हे तू मला का बरं विचारतोस? समर्थांच्या या प्रश्नाला समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या तीन अवस्थांचा विचार केला पाहिजे. आपण सामान्य जीव जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थांमध्ये जगतो. आम्हांला कर्तेपणाचा प्रश्न हा सतत जागृत अवस्थेत पडणारा असतो. आम्ही ज्या, ज्या वेळेला सतत या कर्माचा विचार करत असतो अशा जागृतीच्या अवस्थेतच आम्हांला कर्तेपणाचा प्रश्न पडतो. परंतु ज्यावेळेला आम्ही निद्राधीन होतो, ज्यावेळेला आम्ही स्वप्न आणि सुषुप्ती यामध्ये जगत असतो त्यावेळेला स्वप्नामध्ये देखील अनेक घडामोडी घडत असतात. स्वप्नामध्ये कित्येकदा आपण अशा लोकांना भेटतो की ज्यांना आपण कधी बघितलेले नाही, त्यांच्याशी व्यवहार करतो, त्यांच्याशी संवाद करतो, अनेक घटना वेगवेगळ्या तर्क किंवा तर्काला न शोभणाऱ्या अशा आपल्या गाढ स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये घडत असतात. स्वप्न आणि सुषुप्तींमध्ये घडणाऱ्या घटनांचा कर्ता कोण आहे याचे उत्तर जर आपण शोधू लागलो तर आपल्या स्वप्नांवर आपले नियंत्रण नाही,कुठले स्वप्नं पडावे त्या स्वप्नात नेमकी काय घटना घडायची त्या सर्व घटनांना आपण नियंत्रित करू शकत नाही,कदाचित स्वप्नात थोडे जागे झालो तर त्या जागृत अवस्थेत स्वप्नांवर आपण नियंत्रण आणू शकतो.परंतु आमचे स्वप्न जेव्हा जागृती अवस्थेच्या पलिकडे अगदी गाढ सुषुप्तीमध्ये आहेत अशावेळी त्या स्वप्नांचे कर्तेपण मला माझ्याकडे घेता येत नाही. परंतु स्वप्नांच्यामध्ये एक छोटासा तर्कवाद असा असतो की जे, जे काही आपल्या चित्तात खोलवर रूतलेले असते, जे, जे काही आपल्या जीवनातले कर्म, अनुभव असतात त्या कर्म, अनुभवांची छाया त्या स्वप्नांवरती पडलेली असते. श्रीमहाराज याचे उदाहरण देताना म्हणायचे की एखाद्याने जर पोटभर काकडी खाल्ली तर त्याला ढेकरही काकडीचाच येतो त्याप्रमाणे आपल्या स्वभावामध्ये, चित्तामध्ये जे काही संस्कार आहेत त्या संस्काराच्या आधीन आपली स्वप्न आसतात. संत आता आपल्याला एक पाऊल उचलून वरती आणतात आणि ते ज्या भूमिकेतून या दृश्यजगाकडे बघतात त्या दृश्यजगात घडणारी प्रत्येक घटना, हा जो कर्तेपणाचा चाललेला आमचा शोध हे सर्वकाही या परब्रह्मस्वरूपाची असलेली ग्लानी, हे आमचे अज्ञान, ही आमची गाढ सुषुप्ती आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही स्वतःला जागृत समजून जे काही कार्य करत आहोत ती आमची गाढ अज्ञानरूपाची निद्रा आहे, या निद्रेत आम्ही सर्वजण बरळत आहोत. आम्ही सर्वजण या कर्त्याचा जो शोध घेत आहोत तेच मुळी आमचे अज्ञान आहे. अजूनही आम्हांला या विश्वाचे खरे रूपच कळालेले नाही. याला प्रमाण म्हणजे महादेवाने आपला निज, स्वतःचा अनुभव पार्वतीला सांगितला की हे पार्वती ऐक मी तुला माझा स्वतःचा अनुभव सांगतो आणि तो निज अनुभव असा आहे की हे सर्व जग स्वप्न आहे, यासाठी एकच मार्ग तो म्हणजे सत्याचा आणि सत्य हरीभजनामध्ये तुला गवसू शकते. आम्ही हरीभक्तीत इतके तल्लीन झालो आहोत का? की आम्हांला स्वतःच्या देहाचा, या जगाचा विसर पडेल? आज आमची खरी हरीभक्तीची कल्पना दृढ झाली का? ज्यांना हरीभजनात स्वतःच्या देहाचा विसर पडला त्याच्यासाठी हे जगत् केवळ एक स्वप्न होऊन जाते. आमच्यासाठी हे दृश्यजग सत्य आहे या भूमिकेपासून आम्ही कधीच दूर जाऊ शकत नाही. हा फार सूक्ष्म विचार आहे, त्या विचारांच्या खोलीत जाण्यासाठी माझी बैठक, माझी निष्ठा, साधना, माझे नामास्मरण, भगवंताविषयीची माझी करूणा ही जेव्हा माझ्या अंतःकरणात संपूर्णपणे भरून उरते त्यावेळेला आमची कबीरा सारखी अवस्था होते. कबीराला भजनामध्ये त्याच्या पायाला चावणारा कुत्रा बघून लोकं म्हणतात अरे कबीर तुझ्या पायाला कुत्रा चावतोय यावरती तो म्हणतो की चमडा जाने, कुत्ता जानेही अशी अवस्था ज्यांनी आपल्या अंतःकरणात अनुभवली तेच या विश्वाचे खरे कर्तेपण समजून घेतात. जसे स्वप्नावर आपले पूर्वसंस्कार, चित्तामधल्या आठवणी, आपले अनुभव याची छाया असते, ज्याप्रमाणे आपला स्वभाव असतो तशी आपल्याला स्वप्नं पडतात. तसे या दृश्यजगात स्वभावतःच घटना घडत आहेत. त्यामुळे समर्थ म्हणतात की या सगुणाकडे नाही, निर्गुणाकडे नाही या विश्वाचे कर्तेपण शोधण्याचा प्रयत्न करणे हेच मुळी अज्ञान आहे. या विश्वाचे कर्तेपण केवळ आणि केवळ आत्मज्ञानी संतांनी जाणले आणि त्यांना या विश्वामध्ये कुठंही कर्ता हा शोधून बघताक्षणी सापडला नाही. *येथें कर्ताचि दिसेना ! प्रत्यये आणावा अनुमाना !* *दृश्य सत्यत्वें असेना ! म्हणोनियां !!१३.८.३४.!!* इथं त्यांना हे दृश्यजग कधी किंमतीच्या आधारे दिसलेच नाही, ते त्यांना कधी सत्य आहे असे भासलेच नाही त्यामुळे या विश्वामध्ये केवळ परब्रह्मस्वरूपाच्या पलिकडे दुसरी कुठलीही अनुभूती झाली नाही. संतांनी आत्मज्ञानाच्या दृष्टीने केवळ भगवंताची करूणास्वरूप या दृष्टीने बघितले. या प्रत्येक घडणाऱ्या घटनांमध्ये त्यांना राम दिसत होता. प्रत्येक गोष्टीला त्यांनी राम म्हणूनच बघितले. संताना हा संपूर्ण देह म्हणजे रामच जाणवलेला आहे. मग तिथं कर्तेपण कोणाकडे? इथं हा कर्ताच संपून गेला, हा कार्यकारण सिद्धांतच संपून गेला. जोपर्यंत मी जीव आहे तोपर्यंत या दृश्यजगाशी माझे द्वैत आहे, तोपर्यंत ही सृष्टीनिर्मिर्ती झाली हा माझ्या मनातला मानस आहे तोपर्यंत कर्त्याचा शोध ही माझी स्वाभाविक प्रवृत्ती आहे पण ज्यावेळी मी खरा भजनानंदी होईन, ज्यावेळी मला माझ्या देहाचा, माझ्या अस्तित्वाचा विसर पडेल त्याक्षणी हे दृश्यजग त्याच्या रूपामध्ये न राहता ते त्या स्वरूपामध्ये माझ्यासाठी प्रगटेल आणि ते स्वरूप म्हणजे राम आहे. *बरें पाहतां प्रत्यये आला ! तरी कां करावा गल्बला !* *प्रचित आलियां आपणाला ! अंतर्यामी !!१३.८.३६.!!* समर्थ म्हणतात मी तुम्हांला सांगतो हे सत्य आहे आज तुम्हांला या सत्याचा अनुभव नाही म्हणून तुम्ही याचा अव्हेर करू नका तुम्ही तिथपर्यंत या तो अनुभव घ्या ज्यावेळी तुम्हांला याचा प्रत्यय येईल त्यावेळेला हा भौतिक बाजार, हा गलबला संपून जाईल आणि ज्याला अंर्तबाह्य अनुभूती आली तो अंर्तबाह्य शांत झाला. हाच प्रचीतीचा प्रांत समर्थ आपल्याला सा समासात सांगतात. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १३-नामरुप निरूपण क्रमांक ५१५-भाग ३ मधील सार.* दासबोधातील तेराव्या दशकातील नवव्या समासामध्ये समर्थ जिवात्म्याचे कार्य सांगताना म्हणतात की.... *देहीं सुखदुःखभोक्ता ! तो येक आत्माचि पाहातां !* *आत्म्याविण देह वृथा ! मडें होये !!१३.९.२६.!!* जिवात्मा या देहाच्या आधारे अनेक प्रकारची सुख-दुःखे भोगतो. आणि जिवात्मा देहाला सोडताक्षणी हा देह केवळ एक मढे राहतो. मग इथं मी माझ्या इच्छेने अमुक अमुकच गोष्ट घडावी असा आग्रह धरण्यात काय अर्थ आहे. आणि असा आग्रह धरल्याने जर ती गोष्ट प्राप्त झाली नाही तर त्या गोष्टीमध्ये दुःख भोगण्यापेक्षा संतांनी सांगितलेले जे अंतिम सत्य आहे ते मी माझ्या जीवनात स्विकारून प्रयत्नवादी राहिलो आणि सर्वकाही ही रामाची इच्छा आहे अशा पद्धतीने जीवनात जगलो तर या देहाला सुख-दुःखाची गरज नाही. मग हा जिवात्मा जो देहाच्या आधारे जो सर्व भोग घेतो तो जिवात्मा म्हणजे आहे तरी कोण? समर्थ आपल्याला या जिवात्म्याचा अर्थ समजावून सांगताना म्हणतात.... *जगामध्यें जगदात्मा ! विश्वामधें विश्वात्मा !* *सर्व चालवी सर्वात्मा ! नाना रूपें !!१३.९.२८.!!* प्रत्येकाच्या ह्रदयामध्ये जो जिवात्मा आहे, जो जिवात्मा माझ्या ह्रदयस्थ राहून या देहाला चेतना देतोय,चालवतोय,भोग घेतोय तोच एकच एक जिवात्मा या अनंत शरीरांमध्ये भरून उरलाय, अनंत शरीर म्हणजे केवळ मनुष्यशरीर नाही तर प्राणिमात्रांच्या शरीरात देखील केवळ तोच भरून उरलाय. त्यामुळे जिवात्म्याला संकुचित करणे ही देखील आमची देहबुद्धी आहे. हा एकच एक सर्वत्र पसरलाय त्यामुळे संत म्हणायचे की माझ्याकडे आलेल्या प्रत्येकामध्ये मी केवळ राम बघितला आहे. जसे एखाद्या निरांजनाने दुसऱ्या निरांजनाला प्रज्वलित करावे आणि अशी अनंत निरांजने प्रज्वलित केली तर एकाच वेळेला जसे प्रत्येक निरांजन आपआपल्या पद्धतीने प्रकाश देतं तसे हा जिवात्मा प्रत्येक देहामध्ये प्रकाश देतोय, चैतन्य देतोय, त्याला चालवतोय परंतु अशी अनंत निरांजने आपण जेव्हा एका ठराविक अंतरावरून बघतो तेव्हा केवळ या सगळ्यांमध्ये एकसंघता आपल्याला दिसून येते. म्हणजे एकच निरांजन जे जिवात्म्याच्या रूपाने प्रत्येक देहामध्ये प्रज्वलित झालंय तोच निरांजनाचा हा आकार आपण जेव्हा एका अंतरावरून बघतो तर असा विचार करा की ज्या अनंतकोटी ब्रह्मांडरूपी सद्गुरूंनी या संपूर्ण ब्रह्मांडाला तुर्येच्या आसनावरून बघितलं तर त्यांना या निरांजनामधून एकच एक अग्नी दिसू लागला आणि त्याला संतांनी या ब्रह्मांडामध्ये भरून उरलेला जगदात्मा असे नाव दिले. या जगाच्याही पलिकडे संपूर्ण पसरलेले हे ब्रह्मांड ज्याच्या परीसिमा आज आम्हांला माहित नाही अशा ब्रह्मांडात पसरून ऊरलेला हा विश्वात्मा तो देखील एकच एक निरांजनाच्या प्रकाशाने भरून गेलेला आहे. असा हा अंतरात्मारूपी संपूर्ण ब्रह्मांडाच्याही पलिकडे भरून उरलेला प्रकाश जेव्हा या अंतरात्म्याचे अस्तित्व शोधायला जावे तेव्हा एकच एक परब्रह्मस्वरूप याच्या पलिकडे याचे अस्तित्व राहत नाही. त्यामुळे जो जिवात्मारूपाने आज देहामध्ये भोग घेत आहे तो खरंतर या संस्काराच्या आधाराने जिवात्मा झाला अन्यथा तो केवळ ब्रह्मस्वरूप आहे. यालाच अहम् ब्रह्माऽस्मि असे अत्यंत शुद्ध बोधाचे स्वरूप सर्व संतांनी आपल्याला दिले. म्हणून संत या जिवात्म्याला त्याची ओळख करून देण्याच्या दृष्टीने आपल्याला सतत नामस्मरणाची धारा अंतरंगामध्ये प्रज्वलित ठेवा याची वारंवार पृच्छा करत असतात. या जिवात्म्याची देखील एक स्वाभाविक आवड आपल्या मूळ शुद्ध स्वरूपात रममाण होण्याची आहे. त्यामुळे ज्याक्षणी आम्हांला या देहाला संतांचा समागम घडतो त्यासरशी देहाच्या आधाराने जिवात्मा देखील आपल्या मूळ स्वरूपाच्या दृष्टीने शुद्ध होण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल करू लागतो. आणि जीवनातले हे सर्व संस्कार धुवून टाकले की केवळ हे परब्रह्मस्वरूप उरते. इथं तू आणि मी यांच्यातील संपूर्ण भेद संपून जातो. असे हे विलक्षण जिवात्मा ते परब्रह्मस्वरूपापर्यंतचा प्रवास म्हटलं तर हा अत्यंतिक छोटा प्रवास परंतु अहंकाराच्या भीतीने, मी म्हणजे देह या भूमिकेमुळे अनंत जन्म देखील जीवाला संपत नाहीत असा हा प्रदीर्घ परमार्थाचा भाग. त्यामुळे संतांनी मी म्हणजे देह या अहंकाराला तुम्ही सोडा आणि तोच एक परमात्मा प्रत्येकाच्या ह्रदयस्थ आहे या भूमिकेतून हे दृश्यजग म्हणजे ईश्वराचे स्वरूप जाणून त्याची सेवा करा असा बोध आपल्याला वारंवार दिलेला आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १३-नामरुप,समास ९- आत्मविवरण,निरूपण क्रमांक ५११ – भाग ३ मधील सार.* दासबोधातील तेराव्या दशकातील आठव्या समासात या विश्वाचा कर्ता कोण या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सांगत आहेत. या सभेत पारमार्थीक गोंधळाची स्थिती निर्माण झाली म्हणून या सभेला थेट बाजार असे नाव समर्थांनी दिले. ज्यापद्धतीने एखाद्या अठवाडी बाजारात एकच वस्तू अनेक लोक जोरजोराने आवाज करून विक्री करत असतात तशीच स्थिती या सभेत झाली आणि त्यामुळे खरे उत्तर शोधण्याची भूमिका ही कुठंतरी हरवून जाऊ लागली. प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात जी निश्चयात्मक भूमिका धरली तीच पुढे रेटण्याचा प्रयत्न करतोय. मग शेवटी या सभेचा जो मुख्य वक्ता आहे असतो त्यालाच नियमित करणे गरजेचे असते. या विचारांच्या गलबल्यातून जे हलाहल प्रत्येकाच्या ह्दयात होतं ते समोर प्रगटले आणि महादेवरूपी समर्थ या हलाहलाला केवळ करूणेपोटी आपल्या अंतःकरणामध्ये स्विकारतात आणि मग या विश्वाचा खरा कर्ता कोण आहे या दृष्टीने आपली भूमिका मांडू लागतात. समर्थ म्हणतात.... *बहु लोकांचा बहु विचार ! अवघा राहों द्या बाजार !* *परंतु याचा विचार ! ऐसा आहे !!१३.८.२४.!!* *जें जें कर्तयानें केलें ! तें तें त्याउपरी जालें !* *कर्त्यापूर्वीं आडळलें ! न पाहिजे कीं !!१३.८.२६.!!* प्रत्येकजण आपआपल्या ज्ञानाच्या भूमिकेतून या विश्वाचे कर्तेपण मांडतोय परंतु तुम्ही ज्याला कर्तेपण देत आहात त्या तत्वाला थोडं समजून घ्या असे म्हणून समर्थ साभेला शांत करतात आणि मग थोडंस अंर्तमुख करणारी भूमिका ते तुम्हां-आम्हां प्रत्येकासमोर मांडू लागतात. एखादं मडके जर कुंभाराने तयार केले तर प्रथमतः कुंभार निर्माण होतो त्यानंतर त्या कुंभाराच्या निर्मितीनंतर तो कुंभार त्याला निर्माण करतो हा साधा तर्कशुद्ध वाद आहे. म्हणजे कर्ता आधी आणि त्याने निर्माण केलेले हे एक निमित्तकारण होऊन जो कार्य घडवत आहे ते कार्य त्याच्यानंतर. मग समर्थांचा प्रश्न असा..... *केलें तें पंचभूतिक ! आणि पंचभूतिक ब्रह्मादिक !* *तरी भूतांशें पंचभूतिक ! केलें तें घडेना !!१३.८.२७.!!* हे संपूर्ण ब्रह्मांड पंचमहाभूतांनी निर्माण केलेले आहे ज्याला आम्ही अनामिक ईश्वर अशी संज्ञा दिली. मग या पंचमहाभूतामधून ब्रह्मांडाची निर्मिती ईश्वराने केली असा जर प्रश्न केला तर आपल्याला मूळमायेपर्यंत जावे लागते. या ब्रह्मांडात ज्या, ज्या सगुणदेवतेकडे आपण बघत आहोत यातील प्रत्येकाने माझ्या श्रद्धेने या ब्रह्मांडामध्ये देह धारण केले याबद्दल आमच्या मनात शंका नाही परंतु आज ते त्याच सगुणरूपामध्ये या पृथ्वीतलावर अस्तित्वात नाहीत, ते तत्वरूपाने आहेत परंतु त्यांच्या सागुणरूपाला त्यांनी त्यांच्या लीला पूर्ण झाल्यानंतर प्रभू रामचंद्रानी ज्यापद्धीने शरयूमध्ये स्वतःला समर्पित केले, श्रीकृष्ण जसा पारध्याच्या बाणाने आपले लीलाकार्य संपुष्टात आणतो त्यापद्धतीने या प्रत्येक सगुणदेहाने या प्रकृतीच्या नियमाप्रमाणे स्वतःच्या देहाला आपल्या सर्व लीलानंतर विसर्जीत केले, म्हणजे ते जेव्हा प्रकृतीच्या अख्त्यारीत आले तेव्हा त्यांनी देखील पंचमहाभौतिक देह धारण केला होता. जर आवनीला या पंचमहाभूतांनी तयार केले आणि या अवनीवर हे सर्व ईश्वरी अवतार फिरले. त्यांनी देह धारण केले आणि लीला संपल्यानंतर या पंचमहाभूतांकडे स्वतःला स्वाधीन केले आणि आपला जो आधीचा तर्कवाद होता की कर्ता आधी आणि मग त्याने केलेली क्रिया नंतर तर मग पंचमहाभूतांच्या पोटी कर्ता कसा निर्माण होवू शकेल? हा समर्थांचा खरा प्रश्न आहे. या पंचमहाभूतांच्या अख्त्यारीत संतानी, राम, कृष्णाने आपला देह धारण केला ते पंचमहाभूतांच्या नंतर निर्माण झाले, या सगुणदेहाला धारण करण्यासाठी त्यांना सगुणदेहाची गरज पडली मग तेच या पंचमहाभूतांचे कर्ते कसे ठरू शकतात? हा समर्थांचा तर्कवाद आहे. मूळमायेचा निर्माता कोण याचा विचार करता, करता मूळमायेच्या पलिकडे गेले तर केवळ परब्रह्म उरते. तर मूळमायेची निर्मिती परब्रह्माने केली असे म्हणता येईल का? आणि मग परब्रह्माकडे कर्तेपण दिले तर परब्रह्माला कर्तेपण देताक्षणी त्याची निर्विकल्प, निर्गुण या सर्व उपाधींच्या आधाराने आपण आजपर्यंतची केलेली चर्चा आहे ती व्यर्थ ठरून जाईल. कारण परब्रह्माकडे स्वतःचे कर्तेपण नाही, तो कुठल्याही प्रकारची निर्मिती करू शकत नाही, तो कुठल्याही प्रकारच्या कार्यकारणसिद्धांतात पडू शकत नाही त्यामुळे मूळमायेची निर्मिती परब्रह्माने केली हा तर्कवाद इथं थांबून जातो. *निर्गुणास कर्तव्य न घडे ! सगुण जाल्यांत सापडे !* *आतां कर्तव्यता कोणाकडे ! बरें पाहा !!१३.८.३०.!!* या निर्गुणाकडे आपण कर्तेपण देवू शकत नाही आणि सगुणतत्वाकडे कर्तेपण द्यायला गेलो तर सगुणाची निर्मिती ही ज्या सगुणतत्वातून झालेली आहे त्याला त्यानेच निर्माण केले असे आपण कसे म्हणायचे? आईच्या उदरात असलेल्या लेकरानेच आईची निर्मिती केली हे असे म्हणण्यासारखे आहे. त्यामुळे या सगुणतत्वाकडे कर्तेपण देता येत नाही, या निर्गुणतत्वाला कर्तव्याचा स्पर्श होवू शकत नाही मग या संपूर्ण दृश्यजगाचे कर्तेपण कोणाचे हा तर्क समर्थ आपल्यासमोर ठेवतात. या विश्वाचे कर्तेपण ना सगुणतत्वाकडे जाते ना निर्गुणतत्वाकडे मग या विश्वाचा कर्ता कोण हा प्रश्न या सभेमध्ये सर्वांना अंर्तमुख करून जातो. अशा सगुण आणि निर्गुण या दोन्ही तत्वांकडे ज्या विश्वाचे कर्तेपण जात नाही त्याचे स्पष्ट उत्तर केवळ आत्मज्ञानी सत्पुरुषच जो त्याच्या अंतःकरणात तद्रूपतेने जाणत असतो. ती तद्रूपता शब्दांमध्ये व्यक्त करता येवू शकत नाही. त्यामुळे या आत्मज्ञानी सत्पुरुषाने ज्या वेळी या संपूर्ण दृश्यजगाचे रूप जाणले तोच त्याच्या डोळ्यांतून, त्याच्या कृतीमधून, त्याच्या शब्दांतून आपल्याला या विश्वाचे खरे स्वरूप, या विश्वाचा खरा कर्ता कोण आहे हे वारंवार सांगत असतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १३-नामरुप,समास ८-कर्तानिरूपण,निरूपण क्रमांक ५११ – भाग ३ मधील सार.* दासबोधातील तेराव्या दशकातील आठव्या समासात या विश्वाचा कर्ता कोण या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सांगत आहेत. या सभेत पारमार्थीक गोंधळाची स्थिती निर्माण झाली म्हणून या सभेला थेट बाजार असे नाव समर्थांनी दिले. ज्यापद्धतीने एखाद्या अठवाडी बाजारात एकच वस्तू अनेक लोक जोरजोराने आवाज करून विक्री करत असतात तशीच स्थिती या सभेत झाली आणि त्यामुळे खरे उत्तर शोधण्याची भूमिका ही कुठंतरी हरवून जाऊ लागली. प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात जी निश्चयात्मक भूमिका धरली तीच पुढे रेटण्याचा प्रयत्न करतोय. मग शेवटी या सभेचा जो मुख्य वक्ता आहे असतो त्यालाच नियमित करणे गरजेचे असते. या विचारांच्या गलबल्यातून जे हलाहल प्रत्येकाच्या ह्दयात होतं ते समोर प्रगटले आणि महादेवरूपी समर्थ या हलाहलाला केवळ करूणेपोटी आपल्या अंतःकरणामध्ये स्विकारतात आणि मग या विश्वाचा खरा कर्ता कोण आहे या दृष्टीने आपली भूमिका मांडू लागतात. समर्थ म्हणतात.... *बहु लोकांचा बहु विचार ! अवघा राहों द्या बाजार !* *परंतु याचा विचार ! ऐसा आहे !!१३.८.२४.!!* *जें जें कर्तयानें केलें ! तें तें त्याउपरी जालें !* *कर्त्यापूर्वीं आडळलें ! न पाहिजे कीं !!१३.८.२६.!!* प्रत्येकजण आपआपल्या ज्ञानाच्या भूमिकेतून या विश्वाचे कर्तेपण मांडतोय परंतु तुम्ही ज्याला कर्तेपण देत आहात त्या तत्वाला थोडं समजून घ्या असे म्हणून समर्थ साभेला शांत करतात आणि मग थोडंस अंर्तमुख करणारी भूमिका ते तुम्हां-आम्हां प्रत्येकासमोर मांडू लागतात. एखादं मडके जर कुंभाराने तयार केले तर प्रथमतः कुंभार निर्माण होतो त्यानंतर त्या कुंभाराच्या निर्मितीनंतर तो कुंभार त्याला निर्माण करतो हा साधा तर्कशुद्ध वाद आहे. म्हणजे कर्ता आधी आणि त्याने निर्माण केलेले हे एक निमित्तकारण होऊन जो कार्य घडवत आहे ते कार्य त्याच्यानंतर. मग समर्थांचा प्रश्न असा..... *केलें तें पंचभूतिक ! आणि पंचभूतिक ब्रह्मादिक !* *तरी भूतांशें पंचभूतिक ! केलें तें घडेना !!१३.८.२७.!!* हे संपूर्ण ब्रह्मांड पंचमहाभूतांनी निर्माण केलेले आहे ज्याला आम्ही अनामिक ईश्वर अशी संज्ञा दिली. मग या पंचमहाभूतामधून ब्रह्मांडाची निर्मिती ईश्वराने केली असा जर प्रश्न केला तर आपल्याला मूळमायेपर्यंत जावे लागते. या ब्रह्मांडात ज्या, ज्या सगुणदेवतेकडे आपण बघत आहोत यातील प्रत्येकाने माझ्या श्रद्धेने या ब्रह्मांडामध्ये देह धारण केले याबद्दल आमच्या मनात शंका नाही परंतु आज ते त्याच सगुणरूपामध्ये या पृथ्वीतलावर अस्तित्वात नाहीत, ते तत्वरूपाने आहेत परंतु त्यांच्या सागुणरूपाला त्यांनी त्यांच्या लीला पूर्ण झाल्यानंतर प्रभू रामचंद्रानी ज्यापद्धीने शरयूमध्ये स्वतःला समर्पित केले, श्रीकृष्ण जसा पारध्याच्या बाणाने आपले लीलाकार्य संपुष्टात आणतो त्यापद्धतीने या प्रत्येक सगुणदेहाने या प्रकृतीच्या नियमाप्रमाणे स्वतःच्या देहाला आपल्या सर्व लीलानंतर विसर्जीत केले, म्हणजे ते जेव्हा प्रकृतीच्या अख्त्यारीत आले तेव्हा त्यांनी देखील पंचमहाभौतिक देह धारण केला होता. जर आवनीला या पंचमहाभूतांनी तयार केले आणि या अवनीवर हे सर्व ईश्वरी अवतार फिरले. त्यांनी देह धारण केले आणि लीला संपल्यानंतर या पंचमहाभूतांकडे स्वतःला स्वाधीन केले आणि आपला जो आधीचा तर्कवाद होता की कर्ता आधी आणि मग त्याने केलेली क्रिया नंतर तर मग पंचमहाभूतांच्या पोटी कर्ता कसा निर्माण होवू शकेल? हा समर्थांचा खरा प्रश्न आहे. या पंचमहाभूतांच्या अख्त्यारीत संतानी, राम, कृष्णाने आपला देह धारण केला ते पंचमहाभूतांच्या नंतर निर्माण झाले, या सगुणदेहाला धारण करण्यासाठी त्यांना सगुणदेहाची गरज पडली मग तेच या पंचमहाभूतांचे कर्ते कसे ठरू शकतात? हा समर्थांचा तर्कवाद आहे. मूळमायेचा निर्माता कोण याचा विचार करता, करता मूळमायेच्या पलिकडे गेले तर केवळ परब्रह्म उरते. तर मूळमायेची निर्मिती परब्रह्माने केली असे म्हणता येईल का? आणि मग परब्रह्माकडे कर्तेपण दिले तर परब्रह्माला कर्तेपण देताक्षणी त्याची निर्विकल्प, निर्गुण या सर्व उपाधींच्या आधाराने आपण आजपर्यंतची केलेली चर्चा आहे ती व्यर्थ ठरून जाईल. कारण परब्रह्माकडे स्वतःचे कर्तेपण नाही, तो कुठल्याही प्रकारची निर्मिती करू शकत नाही, तो कुठल्याही प्रकारच्या कार्यकारणसिद्धांतात पडू शकत नाही त्यामुळे मूळमायेची निर्मिती परब्रह्माने केली हा तर्कवाद इथं थांबून जातो. *निर्गुणास कर्तव्य न घडे ! सगुण जाल्यांत सापडे !* *आतां कर्तव्यता कोणाकडे ! बरें पाहा !!१३.८.३०.!!* या निर्गुणाकडे आपण कर्तेपण देवू शकत नाही आणि सगुणतत्वाकडे कर्तेपण द्यायला गेलो तर सगुणाची निर्मिती ही ज्या सगुणतत्वातून झालेली आहे त्याला त्यानेच निर्माण केले असे आपण कसे म्हणायचे? आईच्या उदरात असलेल्या लेकरानेच आईची निर्मिती केली हे असे म्हणण्यासारखे आहे. त्यामुळे या सगुणतत्वाकडे कर्तेपण देता येत नाही, या निर्गुणतत्वाला कर्तव्याचा स्पर्श होवू शकत नाही मग या संपूर्ण दृश्यजगाचे कर्तेपण कोणाचे हा तर्क समर्थ आपल्यासमोर ठेवतात. या विश्वाचे कर्तेपण ना सगुणतत्वाकडे जाते ना निर्गुणतत्वाकडे मग या विश्वाचा कर्ता कोण हा प्रश्न या सभेमध्ये सर्वांना अंर्तमुख करून जातो. अशा सगुण आणि निर्गुण या दोन्ही तत्वांकडे ज्या विश्वाचे कर्तेपण जात नाही त्याचे स्पष्ट उत्तर केवळ आत्मज्ञानी सत्पुरुषच जो त्याच्या अंतःकरणात तद्रूपतेने जाणत असतो. ती तद्रूपता शब्दांमध्ये व्यक्त करता येवू शकत नाही. त्यामुळे या आत्मज्ञानी सत्पुरुषाने ज्या वेळी या संपूर्ण दृश्यजगाचे रूप जाणले तोच त्याच्या डोळ्यांतून, त्याच्या कृतीमधून, त्याच्या शब्दांतून आपल्याला या विश्वाचे खरे स्वरूप, या विश्वाचा खरा कर्ता कोण आहे हे वारंवार सांगत असतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर