दासबोध।।

‼️ ११नोहेंबर ‼️ 🚩!! श्रीमत दासबोध !!🚩 🌹दशक -२, समास -७ सत्वगुणलक्षण🌹 देवालागीं उपोषण | वर्जी तांबोल भोजन | नित्य नेम जप ध्यान | करी तो सत्वगुण ||३६||श्रीराम॥ शब्द कठीण न बोले | अतिनेमेंसी चाले | योगी जेणें तोषविले | तो सत्वगुण ||३७||श्रीराम॥ सांडूनियां अभिमान | निष्काम करी कीर्तन | श्वेद रोमांच स्फुरण | तो सत्वगुण ||३८||श्रीराम॥ अंतरीं देवाचें ध्यान | तेणें निढारले नयन | पडे देहाचें विस्मरण | तो सत्वगुण ||३९||श्रीराम॥ हरिकथेची अति प्रीति | सर्वथा नये विकृती | आदिक प्रेमा आदिअंतीं | तो सत्वगुण ||४०||श्रीराम॥ 🍁🌺 भावार्थ :-🌺🍁 ♻️⚜️ परब्रह्म प्राप्तीसाठी उपवासाचे व्रत करणे, तांबूलभक्षणासारखी एखादी संवय सोडणे, नित्यनेम, जप-ध्यान करणे, इत्यादि सर्व सत्वगुणलक्षण होय. ♻️⚜️ कोणाला कठोरपणे न बोलणे, अतिनियमितपणाने वागल्यामुळे योगी संतोष पावून कौतुक करतात, हे सर्व सत्वगुणामुळे होत असते. ♻️⚜️ अहंकार सांडून निष्कामपणाने कीर्तन करत असताना अष्टसात्विक भावापैकी श्वेद, रोमांच, स्फुरण जागृत होणे, हे सर्व सत्वगुणामुळे होत असते. [-“अष्टसात्विक भाव” जागृत होतात तेव्हां असा भक्त विदेही अवस्थेत १]स्तंभित होतो, २] श्वेदयुक्त-घामाघूम होतो,३] रोमांच अनुभवतो, ४]स्वर-भंग अनुभवतो, ५]शरीरकंप अनुभवतो ६] वैवर्ण अनुभवतो म्हणजे शरीर-रंगात बदल अनुभवतो, ७] आनंदाश्रु अनुभवतो, ८] प्रलय अनुभवतो म्हणजे भक्त शुद्ध हरपतो, अर्थात उन्मनी अवस्था अनुभवतो, समाधी अवस्था अनुभवतो. हा कालावधी जास्तजास्त काळ राहावा असं त्या भक्तास वाटत राहतं. तहानभूक हरपलेली ती स्थिती कायम रहावी असंच त्यास वाटत असतं.] ♻️⚜️ अंतःकरणांत भगवंताचे ध्यान करत असता ’निढारले नयन’ अर्थात डोळे पाण्याचे भरून येणे, देहभान हरपणे, हे सर्व सत्वगुण होत. ♻️⚜️ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हरिकथेविषयी अत्यंत प्रेम, जिव्हाळा वाटत असल्यामुळे, कीर्तन संपेपर्यंत त्यात कुठलाही दुसरा विकृतपणाचा विषय मनात सर्वथा येत नाही, ते सत्वगुणामुळेच होय. 🛕अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛕 ‼️जय जय रघुवीर समर्थ ‼️

+3 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 19 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें. दशक १४- अखंड ध्याननाम,समास १ – निस्पृह लक्षणनाम, निरूपण क्रमांक ५२१ – भाग १ मधील सार.* श्रीमद् दासबोध या ग्रंथातील चौदावा दशक ज्याचे नाव अखंड ध्याननाम असे आहे. म्हणजे ध्यानाची आणि नामाची अवस्था कुठल्याही क्षणी खंड न पडता कशा अर्थाने अखंडपणे जीवनामध्ये व्यापून टाकावी याचे विस्तृत विवरण करणारा हा दशक आहे.आणि या दशकातील पहिल्या समासामध्ये समर्थ निस्पृहतेची लक्षणे आपल्याला सांगत आहेत. आपण कशा पद्धतीने संसारात राहून आपली कर्तव्ये पूर्ण करत असताना ही ध्यानाची आणि नामाची अवस्था अंतःकरणात जाऊ शकेल. संतांनी दिलेल्या व्याख्या कित्येकदा आपल्याला अव्यवहार्य वाटतात. संत जेव्हा अखंड ध्यान, अखंड नाम ही अवस्था आपल्याला सांगत असतात त्यावेळी तुमच्या प्रपंचाची त्यांना संपूर्णपणे जाणीव असते, तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या देखील त्यांना माहिती असतात. या सर्वांमध्ये तुम्ही अखंड ध्यान, नाम कसे टिकवावे हाच त्या सर्वांच्या मागच्या तत्वज्ञानाचा खरा गाभा असतो. परंतु अखंड ध्यान, नाम ही अवस्था म्हणजे चोवीस तास नामाच्या बैठकीमध्ये बसून राहाणे हा आपला अज्ञानवश स्विकारलेला आपण बोध आहे. आपण कुठलेही कर्म करू नये असे संताना अभिप्रेत वाटून आपण स्वतःवरच या व्याख्यांपासून दुरावलेली मंडळी आहोत, संत आपल्याला अखंड ध्यान, नाम ही अवस्था जेव्हा सांगतात तेव्हा ती देहाची नसून आपल्या अंतरंगाची अवस्था आहे. आपल्या अंतरंगाची अवस्था भगवंताशी connected ठेवून आपल्या प्रपंचाची कर्म, जीवनात आलेले भोग जीवाने कशा पद्धतीने स्विकारावेत आणि त्यामध्ये आपली अवस्था कशी टिकवावी याचे समर्थ आपल्याला या दशकामध्ये प्रत्येक समासाच्या आधारे अत्यंत गुह्य मार्गदर्शन करणार आहेत. प्रवासाला निघाल्या बरोबर आपल्याला गंतव्य स्थान हे कधीच मिळू शकत नाही. परंतु घरातून आपण गंतव्या स्थानाला आपण जायला निघालो आणि रस्ता जर योग्य असेल तर त्या मार्गावर पडून राहिले असता एक ना एका टप्प्यावर आपल्याला गंतव्य स्थान प्राप्त होते हा जसा व्यवहाराचा नियम आहे तसे मुखातून एकदा राम म्हटले याचा अर्थ आपली पाऊलं योग्य मार्गाने गंतव्य स्थानाच्या दिशेने निघाली आहेत. आता ज्याने आपल्या मुखातून राम वदवून घेतलाय तोच आपली पाऊलवाट कदाचित या जन्मी नाही तर कुठल्या ना कुठल्यातरी टप्प्यावर त्या गंतव्य स्थानापर्यंत नेणार. परंतु आपल्याला हा मनुष्यजन्म मिळाला, एवढे निकोप शरीर मिळाले, जीवनात सद्गुरूंची प्राप्ती झाली तेव्हा जीवनात या अखंड ध्यान, नामाच्या अवस्थेने आपण जर याच जीवानात ती अवस्था साध्य करून घेतली तर? यामध्ये संताच्या ह्रदयाला तर आनंद आहेच पण जीवाला देखील त्याचा सुखधाम प्राप्त झाल्यामुळे जन्ममृत्यूच्या कचाट्यातून त्याची सुटका होणार आहे. त्यामुळे अखंड ध्यान, नाम ही अवस्था आम्हांला स्वतःसाठी त्या सुखधामाच्या प्राप्तीसाठी आवश्यक आहे. निरतिशय प्रेम ही उत्तमपुरुषाच्या अंतःकरणाची खरी अवस्था असते. आणि त्यासाठी जीवनातला स्वार्थ जाळावा लागतो. जोपर्यंत मला एखाद्याकडून अमुक एक गोष्ट हवी आहे अशी जोपर्यंत अपेक्षा आहे तोपर्यंत आम्ही कोणावर निःस्वार्थी प्रेम करू शकत नाही. त्यामुळे श्रीमहाराज म्हणाले की मला व्यावहारिकदृष्या केवळ एका आईचे प्रेम कळते. कारण इतर सर्व व्यावहारिक प्रेम हे स्वार्थावर आधारित आहे. आईचे प्रेम या लौकिक जगात निःस्वार्थतेच्या अत्यंत निकट आहे. परंतु सद्गुरूंचे प्रेम हे त्याच्याही पलिकडचे आहे. अशी निःस्वार्थता, असा उत्तमपुरुष घडण्यासाठी अंतःकरणातला स्वार्थ हा संपूर्णपणे जळायला हवा आणि अंतरंगीचा स्वार्थ हा अखंड ध्यान आणि नामानेच जळू शकतो. जोपर्यंत आपले नाम हे ह्रदयामध्ये मुरत नाही, ह्रदय नवनितासारखे मऊ होत नाही जोपर्यंत देहाधिष्ठीत भूमिकेवर राहून स्वार्थी प्रेम करण्याची ही ढोंगी कला आम्ही सोडत नाही आणि या सगळ्याचे एकच सूत्र आहे ते म्हणजे भगवंताच्या नामाचे आणि ध्यानाचे. अनेक लोक खूप जप करतात, बरीच साधना करतात परंतु व्यावहारिक पातळीवर त्यांच्यातील आसक्ती कमी झालेली दिसत नाही. कुठल्या ना कुठल्या आसक्तीच्या गुंत्यामध्ये साधन करूनही अनेक लोक अडकलेली असतात. समर्थांचे स्पष्ट म्हणणे आहे की अखंडनाम ध्यान ही अवस्था करण्याची गरज नाही ही अवस्था कृतीने दाखवायची आहे. एखादा मनुष्य हातात माळ घेवून फिरतोय, मुखाने अखंड नाम घेतोय ते नाम काही वाया जाणार नाही परंतु अखंड नामाचे, ध्यानाचे मोजमाप करण्याचे साधन म्हणजे त्याने दररोज केलेला जप नाही, त्याने कितीवेळ ध्यान केले हे मोजमाप नाही. त्याची कृती, त्याचे निरतिशय प्रेम, त्याची वृत्ती, त्याचे मोजमाप हे अखंड ध्यान नामाचे निर्देशक आहे. नामाशिवाय वृत्तिपरिवर्तन नाही, नामाशिवाय कृतिपरिवर्तन नाही परंतु हे नाम माझ्या अंतरंगात मुरल्याशिवाय माझा स्वार्थ जळाल्याशिवाय ही अवस्था देखील मला प्राप्त होत नाही. आपण नामाला बसलो आणि तरीदेखील आपले चित्त स्थिरावत नाही तर समजावे की ते नाम आपली गतजन्मीची पापं जाळतंय, आणि ज्यावेळी नामात प्रेम वाढू लागेल तेव्हा ते खऱ्या अर्थाने आपल्याला भगवंताकडे नेतंय, म्हणूनच हाती प्रपंचाचे काम, मुखी भगवंताचे नाम, ऐसा राम जोडा मनी इतका साधा सोपा संताचा जीवन जगण्याचा आर्जव आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये निस्पृहता ज्याच्याध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, जो कुठल्याही आशेने बांधाला गेलेला नाही अशी निस्पृहता हा नामाचा खरा प्राण आहे. असे निस्पृह आचरण आपल्या नामाच्या, ध्यानाच्या कृतीमध्ये उतरू लागले की समजावे ही नामाची आणि ध्यानाची अवस्था आता जीवनामध्ये येऊ लागलेली आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात...... *ऐका निस्पृहाची सिकवण ! युक्ति बुद्धि शाहाणपण !* *जेणें राहे समाधान ! निरंतर !!१४.१.१.!!* अशी ही निस्पृहतेची लक्षणे आचरणात आणल्याने आपल्या जीवनात निरंतर समाधान राहते. जसा एखादा सोपा मंत्र असावा, जसा राम कृष्ण हरी असावा, केवळ राम शब्द असावा अशा सोप्या मंत्राने देखील लोक उद्धरून जातात. समर्थ म्हणतात की अशी ही निस्पृहता मी तुम्हांला साध्या सोप्या शब्दांत माझ्या प्रचितीने सांगतो आणि तुमचा भवरोग दूर करतो. ज्याने तुमचे अवगुण निघून जातील आणि उत्तमगुण तुमचे घर शोधत येतील. असे हे माझे शब्द, औषध थोडेसे जहाल आहे, तिव्र आहे पण जो मनापासून त्याला ग्रहाण करेल त्याच्या जन्माचे कल्याण ठरलेले आहे. अशी निस्पृहता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंगीकारा तिला तुम्ही कधीही सोडू नका. अशी निस्पृहता म्हणजे काय व ती जीवनाच्या व्यवहारात कशी ठेवायची, आपल्या जीवनामध्ये अखंड नाम, ध्यानाची अवस्था कशी आणायची याचे वर्णन समर्थांनी या प्रदीर्घ समासामध्ये केले आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+17 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 20 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १३-नामरुप,समास ८-कर्तानिरूपण,निरूपण क्रमांक ५१० – भाग २ मधील सार.* दासबोधातील तेराव्या दशकातील आठव्या समासामध्ये या विश्वाचा कर्ता कोण? या विश्वात घडणाऱ्या घडामोडींचे कर्तृत्व नेमके कोणाचे? असा प्रश्न सर्व श्रोत्यांसमोर समर्थांनी केला आहे. वक्ता देखील अत्यंत चतुर आहे. एखाद्या सभेत आपल्याला निर्णय जरी घ्यायचा असेल आणि निर्णय काय आहे हे जरी माहिती असेल तरी तो सभेत एकमुखाने संमत होणे अत्यावश्यक आहे. ही एकमुखता येण्यासाठी प्रत्येकाच्या मनात काय विचार आहेत ते समजून घेणे हे त्या सभेच्या नायकाचे काम असते. परमार्थ हा मुळातच स्वातंत्र्याचा विषय आहे. इथे कुठलेही बंधन जीव आज्ञातवश भूमिकेतून कुठलीही गोष्ट स्वतःचे अनुकरण करण्याच्या दृष्टीने स्विकारून परमार्थात कधीच प्रचीतीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. परमार्थ हा शास्त्रप्रचीती, गुरूप्रचीती, आणि आत्मप्रचीतीचा त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे परमार्थात नेतृत्व करणारा सद्गुरू हा कधीही कुठलाही निर्णय लादत नाही. त्या ज्ञानाची अनुभूती घेण्यासाठी समर्थ आपल्याला हे स्वातंत्र्य देऊ इच्छितात की तुमच्या अंतःकरणात या कर्तेपणाबद्दल नेमके काय, काय सिद्धांत आहेत हे तुम्ही व्यक्त करा. संतांची भूमिका ही केव्हाही अज्ञानी जीवाच्या विचारांना प्रवृत्त करण्याची असते. समर्थरूप संत आज्ञानी जीवाला देखील या अशा विश्वाच्या कर्तेपणाविषयी प्रश्न विचारून त्यांच्या मनाची बाजू उघड करण्याचा प्रयत्न करतात. कारण मनुष्य हा मनन करू शकतो आणि संत आम्हांला मननाला प्रवृत्त करत असतात, ते आम्हांला आत्मप्रचीतीसाठी उद्यूक्त करत असतात. म्हणून समर्थ या सभेमध्ये जरी श्रोत्यांनी निश्चयात्मकरित्या या विश्वाचा कर्ता कोण असे विचारले असले तरी संत मुभा देतात आणि म्हणतात की तुम्ही या विषयावर तुमचे मत सांगा. *तव बोलिले सभानायेक ! जे बोलिके येकाहून येक !* *या बोलण्याचें कौतुक ! श्रोतीं सादर ऐकावें !!१३.८.२.!!* तुम्ही हे सर्व चार लोकांनी येऊन केलेले हे विचारमंथन ऐका, या सभेत अनेक लोक बसलेले आहेत प्रत्येकाची पार्श्वभूमी, जीवनाचे अनुभव, जीवनात केलेली साधना यांचे स्तर वेगवेगळे आहेत परंतु संत जे प्रत्येकामध्ये रामरूप बघतात त्यांना या प्रत्येक स्तरावरून या विश्वाच्या कर्तेपणाविषयी व्यक्त केलेल्या मतांचे कौतुक आहे. संत त्यांच्या उत्तराला ऐकून घेतात आणि त्यांच्या मनामध्येच प्रतिप्रश्न निर्माण करतात. जसं पहिला श्रोता उठून बोलतो. *येक म्हणती कर्ता देव ! येक म्हणती कोण देव !* *आपुलाला अभिप्राव ! बोलते जाले !!१३.८.३.!!* एक म्हणतो या विश्वाचे कर्तेपण ईश्वराचे आहे. यावर स्वाभाविकपणे प्रश्न वक्ता त्याच्या अंतःकरणात निर्माण करतो की ईश्वराकडे कर्तेपण आहे हे योग्य आहे पण हा ईश्वर कोण आहे? अशारितीने समर्थ या सभेमध्ये प्रत्येकाला आपला अभिप्राय व्यक्त करण्याची मुभा देतात. *उत्तम मध्यम कनिष्ठ ! भावार्थें बोलती पष्ट !* *आपुलाली उपासना श्रेष्ठ ! मानिती जनीः !!१३.८.४.!!* जगामध्ये सर्व स्तरांवरील लोक या गुह्य प्रश्नाचे अखंड चिंतन करत असतात. त्यात काही आत्मिक पातळीवर साधनेच्या आधारे उत्तम मशागत करून उत्तम प्रतीचे साधक या दृष्टीने या सभेत बसलेले आहेत. काही मध्यम प्रतीचे आहेत ज्यांची प्रपंचातली आसक्ती अजूनही संपलेली नाही परंतु त्यांच्या मनात मुमुक्षत्व निर्माण होवू लागलेले आहे आणि काही कनिष्ठ दर्जाची मंडळी आहेत की ज्यांच्या दृष्टीने हे दृश्यजगच केवळ सत्य आहे. अशा तीन पातळीवरचे लोक प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने मत,अभिप्राय व्यक्त करू लागलेला आहे. आणि समर्थ शांतपणे हा चाललेला सगळा गदारोळ या सभेत चाललेल्या वेगवेगळ्या मतमतांतराचा विचार ऐकून घेत आहेत. यामध्ये साधे उदाहरण द्यायचे झाले तर तुमची आमची प्रत्येकाची श्रद्धा कुठल्या ना कुठल्या अराध्य दैवतावर असते. आणि ते अराध्यदैवत हेच माझ्या जीवनाचा सूत्रधार आहे याची स्पष्ट अनुभूती आपल्याला वैयक्तिक पातळीवर होते. वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना करणाऱ्या देवतांची जिथं आपली श्रद्धा आहे, जिथं आपला अनुभव आहे, ज्याची आपण उपासना केली असता बऱ्याचदा मनासारखे फळही मिळालेले आहे त्याच्याकडे आपण अगदी निःशंकपणे आपले कर्तेपण देत असतो. वैयक्तिक पातळीवर हे बरोबर आहे कारण जिथं माझी श्रद्धा आहे तोच या विश्वाचा कर्ता याविषयी माझ्या वैयक्तिक जीवनात मला कुठल्याही प्रकारची शंका असता कामा नये. परंतु हे सामुदायिक पातळीवर जेव्हा एकमुखाने उत्तर शोधण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला बऱ्याचदा माझा देव हाच माझा अहंकार होतो का? हा देखील अंर्तमुख करणारा प्रश्न आहे. इथं प्रत्येकजण आपआपल्या निष्ठेनूसार त्या, त्या देवतेकडे त्या विश्वाचे कर्तृत्व देतो. सामुदायिक पातळीवर होणाऱ्या चर्चेचे रूपांतरण सांप्रदायिक पातळीवर होते. अज्ञानवश या विश्वाचा खरा कर्ता कोण हे शोधण्याच्या ऐवजी अहंकारापोटी आपल्याच स्वतःमध्ये भीती बाळगून आपल्याच अहंकाराला आपण गोंजारत बसतो. अशीच काहीशी अवस्था या सभेमध्ये झालेली आहे. संताना या गदारोळातूनच ज्याप्रमाणे समुद्रमंथनात पहिल्यांदा हलाहल विष निघाले आणि त्यानंतर शेवटी अमृत निघाले त्यापद्धतीने बुद्धीच्या या अमृतमंथनात लोकांच्या अंतरंगात पसरलेले हे हलाहल, ही सांप्रदायिकता, मी म्हणतो तोच खरा देव इतर दुय्यम, माझाच गुरू श्रेष्ठ इतरांचा गुरू कनिष्ठ अशा पद्धतीने चाललेली आपल्या अंतःकरणातली सांप्रदायिकता दूर करण्याच्या दृष्टीने समर्थ आपल्याला या विश्वाचा कर्ता कोण? ही शोधण्याची भूमिका एका सामुदायिक पातळीवरती देतात आणि त्यामध्ये हे विषयरूपी हलाहल या वेगवेगळ्या विचारांच्या आधाराने व्यक्त होते. अशा हलाहलामधूनच गुरूराया आपल्याला या विश्वाचा खरा कर्ता कोण या उत्तराकडे हळूहळू घेऊन चाललेले आहेत. त्याचे निश्चयात्मक उत्तर तुम्हां-आम्हां प्रत्येकाला हवंय ते उत्तर समर्थ या समासामध्ये देतात. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+10 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 26 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १३-नामरुप,समास १०-शिकवणनिरूपण,निरूपण क्रमांक ५१८ – भाग २ मधील सार.* दासबोधातील तेराव्या दशकातील दहाव्या समासात शिकवण निरूपणाच्या आधारे समर्थ आपल्याला अंतरंग आणि बहिरंगाचा अभ्यास समजावून सांगतात. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला किंमत आणि मूल्य अशी दोन मोजमाप असतात, व्यावहारिक लोकांना सर्व गोष्टी किंमतीच्या आधारानेच कळतात. संत या दृश्यजगात मूल्य आणि किंमत या दोन्हीही गोष्टींचा सारासार विचार करत असतात, प्रत्येकाच्या बाह्यांगाची किंमत जरी वेगवेगळी असली तरी मूल्यमापन करताना संत जेव्हा त्यांच्याकडे बघतात तेव्हा ते प्रत्येकाला रामाचे रूपच समजत असतात. परमार्थात अंतरंगीचे शास्त्र हे मूल्यावर आधारित आणि आचरणाचे, व्यवहाराचे शास्त्र हे किंमतीवर आधारित आहे, या दोघांमधला जर समन्वय साधता आला तरच परमार्थ आणि प्रपंच या दोन्हीही गोष्टींमध्ये मनुष्य सारासार विवेकाच्या आधारे जगू शकतो. *देही आत्मा देह अनात्मा ! त्याहून पर तो परमात्मा !* *निरंजनास उपमा ! असेचिना !!१३.१०.७.!!* इथं मूल्यांकनाला कुठलीही उपमा देता येत नाही एकच मूल्य आहे आणि ते म्हणजे अंतरंगीचे राम या दृष्टिकोनाचे, प्रत्येक जीवामध्ये राम बघण्याची मूल्यावर अधिष्ठान असलेली व्यवस्था संत आपल्याला समजावून सांगतात आणि त्याचबरोबर या दृश्यजगामध्ये भगवंताने किती अनंत प्रकारचे देह धारण केलेले आहेत. *रायापासून रंकवरी ! अवघ्या मनुष्यांचियां हारी !* *सगट समान सरी ! कैसी करावी !!१३.१०.८.!!* या दृश्यजगामध्ये राजापासून ते रंकापर्यन्त अनेक प्रकारचे लोकांचे समुदाय आपल्याला आढळतात. आपण S.T.stand, Railway station, किंवा गजबजलेल्या भागात गेलो तर आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारची लोकं दिसतात, अंतरंगीच्या शास्त्रानुसार त्या प्रत्येकाचे मूल्य राम आहे परंतु जे दृश्य डोळ्यांनी आपण बघत आहोत त्या प्रत्येकाचे आपण बाह्यांगाच्या आधाराने किंमतीचे शास्त्र बघितले तर... *देव दानव मानव ! नीच योनी हीन जीव !* *पापी सुकृति अभिप्राव ! उदंड आहे !!१३.१०.९.!!* एकाच एका भगवंताची ही वेगवेगळी रूपं अंतरंगाच्या शास्त्राने प्रत्येकजण राम आहे परंतु बहिरंगाच्या दृष्टीने जर बघितले तर या सृष्टीमध्ये आपल्याला देवमाणसे, तसेच दानवलोक देखील दिसतात, त्याचबरोबर नीच योनी, हीन जीव, पापी, पुण्यवान असे अनेक प्रकारचे भेद आहेत. म्हणजे एकच एक परमात्मस्वरूप मूल्याच्या आधाराने प्रत्येकाच्या आत रामरूपाने आहे परंतु व्यक्त स्वरूपात देहाच्या आधाराने मात्र प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे. त्यामुळे सारासार विचार करून बघितले तर प्रत्येकाच्या अंतरंगीचे मूल्य हे जरी राम असले तरी देहाच्या आधाराने जी व्यवस्था भगवंताने करून ठेवली ती आपण स्विकारली पाहिजे. या व्यवस्थेशी समन्वय साधून परमार्थात शिरायचे हीच खरी कसोटी आहे. हिमालयात जाऊन एकांतात परमार्थ करणे हे कदाचित सोपे असेल परंतु प्रपंचात, व्यवहारात, लोकांमध्ये राहून आपल्या अंतरंगीचे अनुसंधान टिकवत परमार्थ प्राप्त करणे हे अत्यंतिक अवघड आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला जीव तोडून या दोन्हीही गोष्टींची मूल्याची बाजू आणि किंमतीची बाजू समजावून सांगतात. या परमात्मस्वरूपाने ही वेगवेगळी रूपं धारण केली त्या प्रत्येक रूपाला आपण एकसारखे धरून या जीवन व्यवहारामध्ये स्विकारायला लागलो तर तर आपण स्वतःच्या हातानेच ना परमार्थ नीट करू शकूत ना प्रपंच नीट करू शकूत. प्रत्येकाच्या पूर्वसंस्काराच्या भागाप्रमाणे या सत्व-रज-तमो गुणांचे जे मिश्रण प्रत्येकात दिसते त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आपल्याला समाजात दिसत असतात. अशा परिस्थितीत सर्वांमध्ये तो एकच भगवंत आहे या अंतरंगीच्या मूल्यानूसार जर आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये सरसकट मिसळले तर यातून केवळ आपली मलीनता वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जीवनामध्ये आपण नेहमी उत्तम गोष्टींचा हव्यास धरायला हवा. जीवनात रजो आणि तमोगुणांच्या आधाराने जी कर्म आज आपल्याला भगवंताला साक्षी ठेवून करता येणे शक्य नाही अशा कर्मांचा त्याग होण्यासाठी आपण नेहमी उत्तम गुणांची कास धरायला हवी, या उत्तम गुणांच्या आधारे जगामध्ये जे, जे काही निद्य आहे ते सर्व टाकून द्यावे. ते जरी भगवंताच्या शक्तीमुळे प्रगटत असले तरी त्यावर गुणमायेच्या अमलांमुळे जो रजो आणि तमोगुणांचा गुण त्या भगवंताच्या अंशरूपाला झाकून टाकत आहे अशा वस्तूंचा आपण त्याग करावा आणि विश्वामध्ये जे सत्वगुणांनी परिपूर्ण आहे अशाच गोष्टींचा सदैव हव्यास धरावा. त्यामुळे संत एकाच शब्दांत याचे मर्म आपल्याला सांगतात की, जीवनामध्ये सत्संगतीचे शास्त्र आपण धरावे. कारण संताच्या संगतीमध्ये पडून राहिले असता आपल्याला कुठलेही प्रयत्न न करता या सात्त्विक गोष्टींचा आपोआप अंतरंगाच्या संस्कारात कार्याला त्या सत्संगतीने सुरूवात होवून जाते. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. असे हे विलक्षण सात्संगतीचे शास्त्र तेच या विश्वातले सर्वात उत्तम सेव्य आहे ते आपण ग्रहण करावे, आपल्या जीवनाला उत्तम दिशा द्यावी, अंतरंगीचे मूल्य राम आहे हे जाणून राहावे आणि बहिरंगाच्या आधारे उत्तमगुणांची कास आपण धरावी त्यातून आपले आचरण या विश्वामध्ये आपल्याला उत्तम महंताच्या दृष्टीने घेऊन जाते. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 13 शेयर