https://youtu.be/Sc9Ge7QsxCo

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

*🙏🏻थोर समाजसुधारक, जेष्ठ निरूपणकार, महाराष्ट्र भुषण,आदरणीय,तिर्थरूप,डॉ.श्री नारायण विष्णु तथा नानासाहेब धर्माधिकारी.* *यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी प्रणाम🙏🏻* *माझ्या हृदयप्रिय श्री सदस्यांनो !* *उद्या आपल्या श्री सदगुरु तिर्थरुप नानास्वारींचा ९८ वा वाढदिवस* *जीवन किती जगलो ? त्यापेक्षा कसा जगलो ?ह्या गोष्टीला त्यांनी महत्व दिले.* *आज आपण फक्त आपल्या मुलाबाळांचा विचार करत असतो.आपला व्यवसाय कसा वाढेल ? ,आपल्याकडे पैसा कसा वाढेल ?,कशाप्रकारे जमिनी आपल्याला मिळतिल ह्या स्वार्थी विचारांनी आपण आयुष्यभर कुत्र्यासारखे पळत असतो.* *स्वार्थीपणाने वागतावागता आपण आपले जीवन विषयांसाठी व अवगुणासाठी वाया घालवतो.* *ते करताकरता आपणच वाया जातो.* *मग असा क्षण येतो की"आपणस्वतःसाठी जगलोच नाही."हे लक्षात येते परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.* *उदा.संपूर्ण हापूस आंब्याची पेटी मीच स्वतः खाणार म्हणल्यावर ते खाण्याने आपल्याला एकतर जुलाब होणार किंवा पोटदुखी होणार म्हणजे पदरी दुःखच येणार.* *पण त्याच पेटीतील आंबे वाटून खाल्ले तर लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान आपण पैश्यामध्ये मोजू शकत नाही.* *सांगण्याचे तात्पर्य नाना आंब्याच्या पेटीसारखे जगले.* *स्वतःपेक्षा लोकांना आत्मिकसमाधान दिले.* *त्यांच्या सुखदुखात साथ दिली कधीही स्वतःचा विचार केला नाही.* *आपलेपूर्ण आयुष्य समर्थ कार्याला वाहिले.* *पैशासाठी पळणा-या स्वार्थी माणसापेक्षा लोकांची निष्कामतेने सेवा करणाऱ्या अशा समर्थ नानांचा मला स्वाभिमान आहे.* *आयुष्यात कोणत्याही विषयाच्या ते मागे फिरले नाहीत उलट ते विषयच नानासाहेबांच्या आज्ञेने चालत होते आणि चालत आहेत.* *नानांच्या पुण्याईने आपल्या घराला घरपण लाभले.आपले घर हे विषयांचे घर होते त्या घराला व आपल्या आयुष्याला "घरघर" लागली होती.ती आता कायमची त्यांनी निरुपणाने घालवली.* *आपला आपण स्वार्थ करुन घेतला.आता परमार्थ करायची वेळ आली.स्वतःच्या मुलांसाठी व बायकोसाठी झटणारे आपण , समर्थांसाठी !* *माझ्या नानांसारखे कसे झटणार ?* *म्हणून आज आपण नानांकडे निवेदन मांडु यात कि,आम्हांला* *तुमच्या प्रमाणे जगायचे आहे. आमच्याकडून अलौकिक असे समर्थांचे कार्य करुन घ्या.* *कितीही संकटे आयुष्यात आली ,तरी आम्ही डगमगणार नाही कारण आम्ही समर्थाचे खातो.* *घरात येणारा क्षण हा सदगुरु आज्ञेने आहे.* *माझ्या नानांनी कधीही स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही" सर्व दास"हा माझा श्री धर्माधिकरी परिवार आहे असे ते म्हणत.* *ते गुण माझ्यात यावेत अशी माझी तळमळ आहे.* *नानांप्रमाणे निष्कामतेने समर्थ कार्य माझ्याकडून व्हावे हे वाढदिवसानिमित्त त्यांच्याचरणी नम्र निवेदन.* *"नाना रुपे,नाना साधने |* *नाना तिर्थे,नाना योगे |* *नाना कथा,नाना श्रवणे |* *नाना दिसे ज्ञानचक्षू निरंतरे ||* *अशा अलौकिक विभूतीचा युगांयुगांच्या पुण्याईच्यायोगे मला अखंडित श्रीसेवेचा लाभ मिळतो म्हणून मी विश्वमालकाचा आभारी आहे.* *आपला जन्मोजन्मीचा* *श्री दासानुदास*

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 32 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक ११- भीमदशक,समास ७- चंचळनदीनिरूपण,निरूपण क्रमांक ४२६ – भाग २ मधील सार.* दासबोधातील अकराव्या दशकातील सातव्या समासात समर्थ आपल्याला ही मूळमाया ज्या संपूर्ण दृश्यजगाची जननी, तिचा आवेग, या काळाच्या आवेगाने वाहत जाणारे दृश्यजग आणि त्यातीलच आपण एक घटक याची कशा अर्थाने फसगत या प्रवाहात होते याबाबत सांगत आहेत. समर्थांनी या मूळमायेला पावनगंगा म्हटलेलं आहे कारण जिचा उद्गमबिंदू हा अचंचळरूपी परब्रह्मात झालेला आहे पण तिचा हा धबधबा ज्यावेळेला गुणमायेला छेदून पलिकडं येतो तेव्हा ही मूळमाया सत्व,रज, तमोगुणांचे वेगवेगळे गुणधर्म अंगीकारून या दृश्यजगामध्ये नटते आणि या नदीचा हा प्रचंड प्रवाह संपूर्ण दृश्यजगामध्ये अव्याहत वाहत जातो. आपणही या नदीच्या प्रवाहातले एक घटक असल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला या नदीच्या प्रवाहाचा आवेग किती आहे याची कल्पना येऊ शकत नाही. कारण आपण देखील त्या वेगाच्या बरोबर वाहत जाणारे एक जीव असतो. पण ज्यांनी या नदीला साक्षीरूपाने बघितलं, ज्यांनी या नदीच्या उद्गमबिंदू पर्यंतचा प्रवास पूर्ण केला,ज्यांनी या नदीचा आवेग जाणला असे समर्थच या नदीच्या प्रवाहा विषयी अत्यंत निश्चयात्मक भूमिकेतून आपल्याला सांगू शकतात. समर्थ म्हणतात की ही नदी कशी आहे... *वळणें वांकाणें भोवरे ! उकळ्या तरंग झरे !* *लादा लाटा कातरे ! ठांई ठांई !!११.७.३.!!* या नदीचा निश्चित असा प्रवाह आपल्याला सांगता येऊ शकत नाही. काही ठिकाणी ही नदी अत्यंत मोठया पात्ररूपातून वाहत असते, काही ठिकाणी तिच्या वाकड्या धारा आहेत, वळणं आहेत, तिच्यामध्ये भोवरे आहेत, अनंत तरंग आहेत, पानवट चिखल आहे, तर काही ठिकाणी ती आटल्यामुळे तिचा प्रवाह देखील कोरडा आहे. काही ठिकाणी उंच धबधब्याच्या ठिकाणी ती खाली कोसळते तर काही ठिकाणी धारांच्या रूपाने आहे, काही ठिकाणचे तिचे पात्र अत्यंत विशाल तर काही ठिकाणी तिचा प्रवाह अत्यंत चिंचोळा आहे, अशी अत्यंत उथळ असलेली काही ठिकाणी रूंद झालेली ही विचित्र चंचळनदी आहे . तिचा एक विशिष्ट आवेग नसल्यामुळे जसं लौकिक जगात आपण बघतो की जे पट्टीचे पोहणारे विहीरीतले लोक असतात त्यांना कदाचित नदी अवघड वाटू शकते, नदीमध्ये पोहणाऱ्याला समुद्रात पोहणे जमेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रवाहाला ज्यापद्धतीने तो पोहणारा हा सरावाने पोहू शकतो तसं या मूळमायेच्या प्रवाहाला मी छेदून जाईन असे मी,मी म्हणणारे अनेक लोक तिच्या गर्तेत सापडतात कारण तिच्यात वैविध्य आहे. ती काही ठिकाणी सरोवरासारखी शांत, निःस्तब्ध आहे तर काही ठिकाणी धबधब्याच्या रूपाने खळखळाटामध्ये आहे, काही ठिकाणी विशाल अशा नदीच्या पात्र रूपामध्ये ती दिसते तर काही ठिकाणी तिचा प्रवाह अत्यंत चिंचोळा आहे. समर्थ आपल्याला या दृश्यजगामध्ये आपल्यासमोर असलेल्या अनंत प्रसंगाच्या रूपाने या मूळमायेचे स्वरूप आपल्याला सांगतात की, या दृश्यजगामध्ये आपली एकच स्थिती कधीच राहू शकत नाही. कधी आपलं मन प्रसन्न असते, सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडत असतात अशा ठिकाणी त्या नदीचे पात्र आपल्याला विशाल जाणवते त्याच्यामध्ये पोहणे सोपे वाटू लागते, पण जिवनात असे काही प्रसंग येतात की ज्याच्यामुळे मनामध्ये खळखळाट निर्माण होतो,तो प्रसंग आधिभौतिक,आधिदैविक, अध्यात्मिक या त्रिविध तापांचे असू शकतील,अगदी जवळपासच्या,निकटच्या मंडळींचे काही शब्द मनाला टोचून गेले असतील, पण या कुठल्याही तापाच्या आधारे मनामध्ये होणारा खळखळाट हा या मूळमायेचा चंचळ प्रवाह आहे. काही ठिकाणी हे जीवन संपवून टाकावे असे वाटते, काही ठिकाणी हा व्यवहार नकोसा वाटतो, सगळा प्रपंच सोडून जावा अशी धबधब्यासारखी आपली अवस्था होते, की तो धबधबा जसा उंचावरून कोसळावा तसा हा जीव या मूळमायेच्या प्रवाहात कित्येकदा अधःपतनामध्ये देखील पडतो. काही ठिकाणी हिच्या प्रवाहाला अत्यंत रूंदी कमी झाल्यामुळे तिचा वेग जोरात वाढतो, ज्या पद्धतीने आपले मन संकुचित झाले, मनाला एखादी गोष्ट पटेनाशी झाली की या संकुचित मनामध्ये विचारांचा आवेग प्रचंड वेगाने वाहू लागतो, आपल़ अंग तापू लागते, आपल्यालाच काही गोष्टी कळत नाहीत, अगदी मनामध्ये शांत होण्याचा आपण अटोकाट प्रयत्न करतो पण हे मन शांत होत नाही असा हा चिंचोळा प्रवाह की ज्याच्यामध्ये मनाचा आवेग वाढल्याची पातळी आपल्याला जाणवते. या मूळमायेमध्ये अनेक गमंती-जमंती देखील आहेत. जसे पाण्याच्या फेसाचे फुगे झालेले असतात ते आपलं मन वेधून घेत असतात त्याप्रमाणे मूळमायेमध्ये देखील वाळवंटासारखे मृगजळ आपल्याला वारंवार बोलावून घेत आसते. मग हे मृगजळ लौकिकाचे असेल, किंवा दृश्यातील गोष्टींच्या आसक्तीपायी निर्माण झाले असेल पण जसं पाण्याच्या फुग्यांचे अस्तित्व नाही त्यापद्धतीने हे मृगजळ या मायाजाळात आम्हांला खेचून घेत असते त्यात आम्ही हेलकावे खातो, कित्येकदा आम्हांला त्यात आशेचे तुषार जाणवतात. जसं उन्हाळ्यात एखाद्या कारंज्याभोवती जाऊन बसावे आणि थंड शिडकावा अंगावर पडताच जसं मन प्रफुल्लीत होते त्यापद्धतीने ही माया देखील भविष्याचे शिडकावे अंगावर पडाताच आमचे मन प्रसन्न होते. आपली मुलंबाळं मोठी होतील, आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल, सर्वकाही मनासारखे घडेल हीच ती आशा आमच्यावर तुषारासारखी या आधिदैविक तापांमध्ये आम्हांला आशेच्या आधाराने या प्रवाहाशी बांधून ठेवत असते. समर्थ म्हणतात की या प्रवाहात केरकचरा देखील भरपूर आहे. हे मन ज्या सत्वगुणात, कीर्तन, श्रवण, प्रवचनात रमतं तेच मन प्रपंचाच्या विचित्र विचारांमध्येही तितकच रमतं, एखाद्याच्या दोषांचे चिंतन आपण सहजपणे करू लागतो. त्यामुळे या मूळमायेच्या चंचळनदीमध्ये बऱ्याचदा खूप सारा केरकचरा देखील वाहून जाताना दिसत असतो. आपण ही चंचळनदी आपल्या आतमध्ये, आपल्या ह्रदयस्थ बघावी, आपल्या चित्रविचित्र मनाच्या संकल्पनेच्या आधाराने तिचा प्रवाह आपण समजवून घ्यावा. या नदीच्या किनाऱ्यावरच्या जमीनीचे रूप सांगताना समर्थ म्हणतात...... *मृद भूमी तुटोन गेल्या | कठीण तैशेचि राहिल्या |* *ठांईं ठांईं उदंड पाहिल्या | सृष्टीमधें ||११.७.७.||* आपण बऱ्याचदा किनारा गाठतो पण किनारा गाठतांना जी भुसभुशीत माती असते जिचा स्पर्श सुखद असतो अशा या मातीवर आपले घर बांधायचा आपण प्रयत्न केला आणि ही भुसभुशीत माती तिचा जीव देखील अल्प असतो, त्याप्रमाणे आपलं मन जिथं सुख आहे त्या सुखाच्या ठिकाणी रमण्याचा प्रयत्न करतं, हीच अवस्था आपल्याला जीवनभर मिळावी असं वाटतं पण ती अवस्था काही केल्या राहत नाही. आणि ही सुखाची भुसभुशीत जमिन, ही चंचळनदी आपल्या पात्रामध्ये ओढून घेते. ज्याप्रमाणे सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनि आले अशी आमची विचित्र अवस्था ही चंचळनदी करत असते. जीवनामधले जे प्रश्न सुटावेत, ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळावीत यासाठी आपण अगदी डोके फोडून घेतो पण ते प्रश्न काही केल्या सुटत नाहीत, ते प्रश्न जसेच्या तसेच राहतात आणि मनुष्य या प्रश्नांशी आयुष्यभर लढत राहतो पण हे प्रश्न आमच्यापासून कधीच आम्हांला मुक्त होवू देत नाहीत. आणि ही कठीण जमीन मात्र जशीच्या तशीच राहाते. त्यामुळे जीव या चंचळनदीचा घटक अनंत पद्धतीने या चंचळनदीमध्ये नागवला जातो. तो या प्रवाहाबरोबर वाहत असतो, तो अशा निराशेच्या किनाऱ्यावर हिंदळत असतो, तो स्वतःचा जीव वाचवण्याचाही प्रयत्न करत असतो, पण या मूळमायेत असलेले विविध प्रवाह ते परत, परत त्याला त्या मुख्य प्रवाहात खेचून नेतात. मग अशा प्रवाहात जीवाची अवस्था कशी होते समर्थ म्हणतात ...... *येक ते वाहतचि गेले | येक वळशामधें पडिले |* *येक सांकडींत आडकले | अधोमुख ||११.७.८.||* *येक आपटआपटोंच गेली|येक चिरडचिर्डोंचि मेलीं|* *कितीयेक ते फुगलीं | पाणी भरलें ||११.७.९.||* या जीवाची या चंचळनदीमध्ये अशी काही अवस्था होऊन जाते की, त्याची झालेली ही फसगत बघताच लक्षात येते की, हे जीवन किती निरर्थक रितीने जगत आलेलो आहोत.या काळाच्या गर्दीत किती अनंत जीव जन्माला येतात आणि किती जीव मृत्यूच्या खाईमध्ये पडत असतात, इतिहास या प्रत्येकाची नोंद देखील ठेवू शकत नाही, अशी ही अवस्था आहे. आपल्याला त्या लोकांचे स्मरण देखील राहत नाही. असा हा वाहून गेलेल्या माणसांचा चंचळनदीमधला प्रवाह आहे.वळश्यामध्ये पडलेले काही जीव,काही नदीच्या भोवऱ्यात अडकलेले जीव, जीवनातले छोटे, छोटे प्रसंग, लहान-सहान प्रश्न या भोवऱ्यासारखे असतात की जे मनुष्याला खाली खेचत रहतात. आपण त्या प्रवाहातून सुटू देखील शकत नाही आणि तो प्रश्न दूर न गेल्यामुळे आपली घालमेल देखील थांबू शकत नाही. जसं पाण्यात एखाद्याला श्वास न घेता आल्याने तो गुदमरून जातो, कुठंतरी फटीमध्ये त्याचा पाय अडकल्याने त्याला वर येता येत नाही, तसं या मूळमायेच्या प्रवाहात आम्ही असे काही हरवून जातो की परमार्थ, भगवत् दर्शन या सर्व गोष्टी आपण आपल्या हाताने पूर्णपणे बंद करून टाकत असतो. अशा जन्म-मरणाच्या या चक्रामध्ये अनंत जीव सापडतात, मृत्यू देखील याची सुटका करू शकत नाही. तो मृत्यूच पुन्हा आपल्याला नवीन जन्म घ्यायला भाग पाडतो. अशी ही चंचळनदी अव्याहतपणे वाहत जाते. अशा चंचळनदीच्या प्रवाहात अत्यंत सद्भाग्याने काही जीव या नदीमध्ये आपल्याला नेमकी कोणती दिशा शोधायची आहे याचा विचार करतात आणि शेकडा ९९% पेक्षा अधिक लोक जे प्रवाहाबरोबर वाहत असतात त्याच्या उलट प्रवाहात वाहत जाणारा लाखात एकच कोणीतरी निर्माण होतो. *येक बळाचे निवडले | ते पोहतचि उगमास गेले |* *उगमदर्शनें पवित्र जाले | तिर्थरूप ||११.७.१०.||* अशा या चंचळनदीच्या प्रवाहा विरूद्ध पोहून जाणारा लाखात एक जो या नदीच्या उद्गमबिंदू पर्यंत जातो जी उगमाला अत्यंत पवित्र असलेली ही गंगा आहे, तिचं दर्शन घेतो आणि त्या दर्शनाने तो पवित्र होतो, तीर्थरूप होतो. म्हणजे सूक्ष्माकडून स्थूलाकडे धाव घेणे हा तर मायेचा स्वभाव आहे. त्याच्या विरूद्ध दंड ठोकून उभा राहणारा माणूस हा मोठा बलवान असतो. आपले बळ वापरून तो स्थूलाकडून सूक्ष्माकडे जातो. आणि अधिकाधिक सूक्ष्मात शिरता, शिरता अखेर तो निश्चळ ब्रह्मा पर्यंत पोहचतो. ब्रह्म दर्शन झाल्याने तो पवित्र होतो. आणि पवित्र पणाने तो तिर्थाची योग्यता पावतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+8 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 15 शेयर

🌸 *काळ बदलला तशी साधनाही बदलली पाहिजे.* 🌸 *अहंकाराच्या वेगवेगळ्या जाती आहेत, आपण कुणीतरी विशेष आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत असे वाटायला लागले की तो घसरला म्हणून समजायचे.* जगात राहायचे, पण इतर लोक राहातात तसेच राहायचे. मी इतरांपेक्षा वेगळा आहे असे तुम्हाला स्वतःलाच वाटते तेव्हा लोकांनाही तसेच वाटते, कारण लोक अज्ञानी असतात. त्यांनाही असे वाटते की, हा विशेष आहे. उदा. भगवे वस्त्र परिधान केले की हा संन्यासी झाला असे याला वाटते व लोकही त्याच्यामागून धावत सुटतात. का तर त्याच्या अंगावरचे कपडे विशेष आहेत. साधूने जटा वाढविलेली असते. अंगाला राख फासलेली आहे, तोंडाने काहीतरी ओम भूम भूम असे काहीतरी बोलतो आहे, मग लोकांनाही वाटते की हा काहीतरी विशेष आहे व याला स्वतःलाही आपण विशेष आहोत, असे वाटायला लागते. *हे मी का सांगतो आहे? साधेपणाने तुम्ही राहा. जीवनविद्येतली माणसे साधेपणाने राहतात तेव्हा लोकांना आश्चर्य वाटते की, हा माणूस परमार्थ करतो. जीवनविद्येतली माणसे परमार्थ करतात, हेसुद्धा इतरांना कळत नाही कारण त्यांचा वेश एकदम साधा असतो.* --- *सद्गुरु श्री वामनराव पै.* 🍃🌳🍃🌲🍃🎄🍃🌴

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 15 शेयर

*लोकसत्ता :: एकात्मयोग २९४. शांती भस्म :: २ मार्च २०२०* जो अपराध करतो त्याच्यावर अपकार न करता त्याचं हितच साधून द्यायचं, हा पृथ्वीचा गुण अवधूत सांगतो. इतकी शांती ही आपल्याला अशक्य कोटीतली गोष्ट वाटते. पण त्यासाठी आधी आपल्या अशांत होण्याची थोडी छाननी केली पाहिजे. आपल्या अशांत होण्याचं मुख्य कारण आपल्या मनासारखं काही न घडणं, हेच असतं. आता काही अपवाद वगळता, हे जे मनासारखं घडावंसं वाटणं असतं ना, त्यात आसक्तीयुक्त मोहाचा भाग अधिक असतो. पती वा पत्नी नको त्या माणसांवर विश्वास टाकत आहे, काही चुका वारंवार करीत आहे, असं वाटून जीवनाच्या जोडीदाराच्या अशा वागण्यानं अशांत होणं, समजू शकतं. त्या वेळी अमुकच व्हावं, हा आग्रह समजू शकतो. मुलाच्या हितासाठी पालकांकडून होणारी अशी आग्रही वर्तणूक समजू शकते. पण हे अपवाद झाले. प्रत्येकच गोष्ट आपल्याच मनासारखी व्हावी, हाच आपला आग्रह असतो आणि तो प्रत्यक्षात येणं कठीण असतं. त्यामुळे माणूस अशांत आणि अस्वस्थ असतो. श्रीगोंदवलेकर महाराजांनी म्हटलं आहे : ‘गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत हे दु:खाचं मूळ कारण नसून, त्या गोष्टी मनात आहेत, हेच दु:खाचं खरं कारण आहे!’ तेव्हा मनात जेव्हा अवास्तव कल्पना येतात आणि त्या प्रत्यक्षात याव्यात, असा दुराग्रह सुरू होतो, तेव्हाच त्या गोष्टी आपल्या मनाच्या स्वास्थ्यावर परिणाम करू लागतात. त्यातून आपली सुटका करण्याचा एकच उपाय म्हणजे अवास्तव अपेक्षांना प्रथम तिलांजली देणं. यासाठी आपल्याला अतिशय सावधपणे आपल्या मनातल्या हालचालींकडे लक्ष द्यावं लागेल. कारण अनेकदा अनवधानानं आपण चुकीच्या कल्पनांत, आवेगांत, ओढीत अडकतो. पण मनाचं जर निरीक्षण सुरू असेल, तर आपण चुकीच्या ओढींत स्वत:हून गुंतत नाही ना, याचं भान राहील. अवधान असलं, तर अनवधानानं होऊ शकतात अशा चुका टळतील. अशांतीची कारणंही तेवढीच टाळता येतील. एकनाथ महाराजांनी एका अभंगात म्हटलं आहे, ‘‘शांतीचेनी मंत्रें। मंत्रुनी विभूती। लाविली देहाप्रती। सर्व अंगा॥१॥’’ म्हणजे मी शांतीच्या मंत्राची विभूती देहाला आणि सर्व अंगांना लावली. विभूती म्हणजे राखच, पण तिच्यात ईश्वरी दिव्यत्व, पावित्र्याची भावना असते. आधीच ही विभूती दिव्य आणि त्यात ती शांतीच्या मंत्रानं युक्त आहे. ती स्थूल आणि सूक्ष्म अशा वासनात्मक देहाला फासली. त्यामुळे जीवनाचं बाह्य़ आणि आंतरिक अंगही उजळून निघालं. त्यानं काय झालं? तर, ‘‘तेणें तळमळ। हारपली व्यथा। गेली सर्व चिंता। पुढिलाची॥२॥’’ त्यामुळे सर्व तळमळ, व्यथा हरपली आणि सर्व चिंताही गेली. ही चिंता ‘पुढिलाची’ आहे. हा शब्द भूतकाळाचा तसंच भविष्यकाळाचाही संकेत करणारा आहे. अर्थात हे शांतीभस्म सर्वागाला लेपल्यानं मागची-पुढची चिंताही गेली. तेव्हा सर्वसामान्य साधकाला पहिल्याच टप्प्यात पृथ्वीसारखी अनाग्रही आणि अपराध्यावरही उपकार करणारी वृत्ती अंगी बाणवता येणार नाही. अपराध्यालाही तृप्त करण्याचा गुण कसा आहे? तर, ‘‘ऊंसु मोडी त्या गोड भारी। छेदितें शस्त्र गोड करी। पिळिलिया आळिलियावरी। स्वादाचिया थोरी अपकाऱ्यां देतु।।३७५।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). म्हणजे, ऊस मोडला तरी त्याची गोडी कमी होत नाही. तो ज्या शस्त्रानं छेदला जातो, ते शस्त्रही तो गोड करून टाकतो. त्याला चरकात पिळलं वा कढवलं तरी तो अधिकच गोड चव देतो! तशी पृथ्वी अपराध्यावरही कृपाच करीत असते.

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक ११- भीमदशक,समास ७ – चंचळनदीनिरूपण,निरूपण क्रमांक ४२५ – भाग १ मधील सार.* श्रीमद् दासबोधातील अकरावा दशक ज्याचे शीर्षक समर्थांनी भीमदशक असे ठेवलेले आहे त्यामध्ये समर्थांना अभिप्रेत असलेला महंत कशा पद्धतीने ओळखायचा त्याची अंतरंगाची आणि बहिरंगाची लक्षणे कोणती, तो रामकार्यासाठी तयार होत असतो ती प्रक्रिया नेमकी कशी असते याचे चिंतन गेल्या सहा समासातून आपण बघितले, हा सातवा समास या महंताने गाजवलेल्या भीम पराक्रमाचा आहे. या चंचळनदी निरूपणाच्या समासातून समर्थ महंताचा पुरूषार्थ काय असतो तो आपल्याला सांगणार आहेत. समर्थांनी मूळमायेवर नदीचे मोठे सुरस रूपक रचलेले आहे. मूळमाया चंचळ व वासनामय असल्याने ती वाहत्या नदीसारखी आहे, मग ही नदी कुठली आहे? कुठला हा प्रवाह आहे जो अशा या दृश्याजगाला सर्वत्र व्यापून उरलेला आहे अशी चंचळनदी म्हणजे नेमके काय? ज्ञानदशकामध्ये आपण या सृष्टीची रचना बघितली की, निश्चळ,निर्गुण, निराकार परब्रह्मामध्ये ही मूळमाया निर्माण झाल्याचा जो भास होतो की ज्याच्यामुळे हे ब्रह्म आपल्याला चंचळ झाल्यासारखे भासते अशी ही मूळमाया जी जाणीवरूप आहे, तिच्यात प्रचंड ऊर्जा आहे, जिथं ऊर्जा आहे तिथं त्याचे स्थित्यंतर होणं हे अभिप्रेत आहे. मग ही मूळमाया ज्या ॐकार स्वरूपामधून एकप्रकारे या मितिकाक्षराच्या ध्वनीच्या आधाराने जाणीव रूपाने वाहू लागते, जाणीव रूपात जिच्यामध्ये चंचळपण दिसू लागतं, हालचाल दिसू लागते, ही हालचाल, हे चंचळपण जिच्यात सर्व ऊर्जा सामावलेली आहे, या पंचमहाभूतांचे बीज सामावलेले आहे अशी ही प्रचंड ऊर्जा असलेली हालचाल किती विलक्षण असेल. ही मूळमाया ज्यावेळेला स्थित्यंतराच्या आधाराने चंचळत्व धारण करते तेव्हा तिचा प्रचंड मोठा प्रवाह वाहू लागतो. समर्थ म्हणतात की, मूळमाया ही जोपर्यंत तुम्हांला अनुभूतीच्या आधाराने कळणार नाही तोपर्यंत हे केवळ शब्दांचे बुडबूडे तुमच्यासाठी राहतील, तुम्हांला कधीच तिच्या अस्तित्वाची प्रचिती येऊ शकणार नाही. कारण तुमची बुद्धी तर्काच्या आधारे कल्पना प्रांताला ओलांडून पुढं जाऊच शकणार नाही, आणि जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत अनुमान आहे, जोपर्यंत कल्पनेचा प्रांत संपत नाही तोपर्यंत प्रचितीचा प्रांत उघडत नाही, आणि या प्रचितीच्या प्रांताला जोपर्यंत साधक अंतरंगामध्ये श्रद्धेच्या आधारे दृढ करत नाही तोपर्यंत या मूळमायेच्या अस्तित्वाचा भाग कळू शकत नाही. तोपर्यंत या चंचळनदीचा उद्गमबिंदू नीट कळू शकणार नाही. भगवंताच्या नामाचा जो उद्गमबिंदू आहे जिथून या मूळमायेची निर्मिती, तिचा प्रसव या ब्रह्मस्वरूपात दृश्यबाजूनी आपल्याला दिसू लागला तो हा प्रचितीचा प्रांत आहे. मग या प्रचितीच्या प्रांताला कसं बरं समजून घ्यायचं? या प्रचितीच्या प्रांताला तोच जाणू शकतो ज्याच्यावरती ही मूळमाया जाणण्याची कृपा करत असते, ही मूळमाया जोपर्यंत त्या जिवावरती कृपाप्रसाद देऊन आपले स्वतःचे स्वरूप दाखवत नाही तोपर्यंत मूळमायेची, या जगदंबेची व्याप्ती जीव बुद्धीच्या, तर्काच्या आधारे जाणू शकत नाही. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणते की, आईच्या गर्भात असलेले बालक जसे आपल्या आईला बघू शकत नाही तशी आम्ही या मूळमायेचीच सर्व लेकरं आहोत, या मूळमायेच्या आधाराने आम्ही सर्वजण हा देह धारण करून बसलेलो आहोत, आम्ही कशा पद्धतीने सांगणार की ही मूळमाया कशी आहे? आम्ही जे काही सांगूत ते आमचे अनुमान असेल, म्हणून मग तिला जाणण्याचा मार्ग एकच तो म्हणजे तिची संपूर्ण कृपा प्राप्त करून घेणं. आणि तिच्या कृपेचा मार्ग समर्थ आपल्याला सांगतात... *चंचळनदीगुप्त गंगा | स्मरणें पावन करीं जगा |* *प्रचित रोकडी पाहा गा | अन्यथा नव्हे ||११.७.१.||* ही मूळमाया,ही जगदंबा,अर्थातच मूळपुरूषाची भार्या,अर्थातच मूळपुरूषाची अर्धांगिनी ही केवळ त्या नारायणाच्या स्मारणातून, तिच्या असलेल्या अस्तित्वाच्या बोधातून आपल्याला कळू शकते. आणि तिच्या स्मरणाने जेव्हा आपलं मन अति शुद्ध होऊ लागतं तेव्हा मनामध्ये प्रकाश रूपाने आपली स्वतःची प्रचिती ही मूळमाया दाखवते. माया या शब्दाला आम्ही बऱ्याचदा नकारात्मक दृष्टीने वापरतो. माया म्हणजे मिथ्या आहे, माया या शब्दामध्ये काही अर्थ नाही अशा विचित्र पद्धतीने मायेचा अर्थ आजपर्यंत आपल्याला कळालेला आहे. पण समर्थ या मूळमायेला कुठल्याही प्रकारच्या या प्रवाहाला नदीमध्ये सर्वोत्तम असलेली अत्यंत पावन अशा गंगेचे रूप देतात. केवळ लौकिक जगातली गंगा ही आपल्याला प्रगट झालेली दिसते. पण मूळमायारूपी गंगा ही चंचळनदी गुप्तगंगा आहे. आणि जसं गंगेच्या स्नानाने आपण देहाने पवित्र होतो तसं या मूळमायेच्या चंचळरूपी गंगेच्या स्मरणाने सर्व जगाला पावन करणारी ही मूळमाया प्रसाद रूपाने आपली प्रचिती देते तरच आपण तिच्या रूपाला जाणू शकतो अन्यथा तिला जाणण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही. ज्यापद्धतीने एखादा धबधबा हा डोंगराच्या माथ्यावरून खाली पडावा त्यापद्धतीने या परब्रह्माचे एका सूक्ष्मरूपाने एका मितीकाक्षराच्या रूपाने प्रसवलेली ही मूळमाया तिच्या या प्रवाहामध्ये एखाद्या धबधब्यासारखी अधोमुख पद्धतीने वाहू लागली. अशा पद्धतीने परब्रह्मात अत्यंत सूक्ष्मरूपाने निर्माण झालेली ही जाणीव रूपाने विस्तार पावलेली मूळमाया ज्यावेळेला या अधोमुखाच्या दृष्टीने वाहत,वाहत गुणमायेच्या रूपातून या सृष्टीमध्ये आपल्या वेगवेगळ्या रंगाच्या आधारे प्रगटू लागते तेव्हा तिचा खरा असलेला ऊर्जेचा भाग, तिचे हे जाणीवेच्या आधारे चाललेले कार्य आपल्याला कळू लागतं. अशा मूळमायेला या चराचरांमध्ये ठायी, ठायी आपण बघू शकतो, आणि जर ती दृष्टी नसेल तर तिला आपण कधीच या दृश्यजगामध्ये अनुभवू शकत नाही. त्यामुळं या मूळमायेला आणि महादेवाला श्रद्धा विश्वास रूपीनो असे नाव दिलेले आहे. महादेवाला श्रद्धेचे तर मूळमायेला विश्वासाचे रूप याच दृष्टीने सर्व संतांनी दिलेले आहे. कारण की त्या विश्वासातून जो या दृश्यजगाकडे बघतो त्यालाच केवळ आणि केवळ ही मूळमायाच सर्वत्र भरून उरलेली आहे असे दिसते. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+14 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 9 शेयर

*लोकसत्ता :: मनोयोग ४१. षट्विकारदर्शन - १ :: २९ फेब्रुवारी * ४१. षट्विकारदर्शन : १ :: संकल्प आणि विकल्पाची चर्चा सुरू असतानाच एका साधकानं श्रीगोंदवलेकर महाराज संकल्प आणि विकल्पाची चर्चा सुरू असतानाच एका साधकानं श्रीगोंदवलेकर महाराज यांनी ‘मानसपूजा’ या स्तोत्रातील रूपकाची आठवण करून दिली. श्रीरामचंद्रांची मानसपूजा कशी करायची, हे श्रीमहाराजांनी त्यात सांगितलं आहे आणि त्यातली एक ओवी अशी आहे : ‘‘इंद्रियांचा तांबूल जाण। षड्रीपूंची दक्षिणा सुवर्ण। संकल्प विकल्प धनुष्यबाण। रामाहाती दिधला।।’’ इथे धनुष्य जसा हातातच राहातो, तसा संकल्प दृढ धरावा आणि बाण जसा सोडून दिला जातो तसा विकल्प सोडून द्यावा, असा अर्थ काहीजणांना वाटतो. प्रत्यक्षात तसा अर्थ वाटत नाही. याचं कारण रामाचा बाण हासुद्धा लक्ष्यावरच असायचा. बाण हातातून नुसता सोडून दिला जात नाही, तो लक्ष्यावरच सोडला जातो. मग इथे काय अर्थ असावा? तर इंद्रियांच्या योगानं विषयरसाची जी गोडी लागली आहे ती आणि षट्रीपूंची म्हणजे काम, क्रोध, लोभ-मोह, मद, मत्सर, दंभ यांची सुवर्ण दक्षिणा रामाला अर्पण करावी. आता सहा विकारांना सोनं का म्हंटलंय? तर हेच विकार भगवंताकडेही वळवता येतात म्हणून! केवळ भगवंताची कामना धरावी (काम), साधनेसाठी समर्पण होत नसल्याचा खेद असावा (क्रोध), उपासनेची ओढ असावी व तिच्याशिवाय अन्य कशाचा प्रभाव मनावर नसावा (लोभ व मोह).. आता मद आणि मत्सराचं रूपांतर फार सूक्ष्म आहे. ‘मी कोण आहे’ याचा मद उरू नये, तर ‘मी कुणाचा आहे’ या जाणिवेनं सर्व गोष्टींमधलं गुंतणं तुच्छवत् वाटावं हा रूपांतरित मद आहे आणि प्रभूंचे किती अनन्य भक्त होऊन गेले, मी तसा का होत नाही, हे ‘तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो,’ असं मत्सराचं रूपांतर व्हावं. तर असे रूपांतरित, जणू विरक्तीच्या अग्नीनं झळालेलं सुवर्ण दक्षिणा म्हणून द्यायचं आहे. मग काय म्हणतात? तर आजवर भौतिक संकल्पाचं धनुष्य आणि त्यांच्या पूर्तीसाठी धडपडतानाच विफल ठरणारे विकल्पवत बाण, हे दोन्हीही प्रभूंनाच अर्पण करावं आणि प्रभूंच्या हातीच धनुष्य-बाण द्यावा, कर्तेपणा द्यावा! मग माझ्या विकल्पांवर तेच बाण सोडतील! श्रीमहाराजांच्या ‘मानसपूजे’तील हे चरण आपल्या पुढील चर्चेला अधिक प्रवाहित करणारे आहेत कारण सहाव्या श्लोकाच्या निमित्तानं ‘षट्विकारदर्शना’चा प्रारंभ होत आहे! हे सहा विकार आपण आधीच पाहिले ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि दंभ. त्यांचा उल्लेख पुढील सहाव्या श्लोकांत आहे. हा श्लोक असा : नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नानाविकारी।। नको रे मना सर्वथा अंगिकारूं। नको रे मना मत्सरू दंभभारू।। ६।। आता हा श्लोक वाचला तर वाटेल की यात केवळ काम, क्रोध आणि मत्सर यांचाच स्पष्ट उल्लेख आहे. पण तसं नाही, लोभ आणि मोह हे कामनेतूनच उत्पन्न होत असल्याने त्यांचा संकेत ‘काम नानाविकारी’ या शब्दांत आहे आणि ‘नको रे मना सर्वथा अंगिकारूं।’ हा जो तिसरा चरण आहे, तो प्रत्यक्षात ‘नको रे मदा सर्वथा अंगिकारूं।’ असा असला पाहिजे. तेव्हा या श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ असा की, ‘‘हे मना, काम म्हणजे कामना या घातक विकारांतूनच क्रोध, लोभ, मोह आदी नानाविकार उत्पन्न होतात. क्रोध हा अखेरीस खेदच उत्पन्न करतो. त्यामुळे या काम, क्रोध, लोभ, मोहाचा त्याग कर. मद म्हणजे अहंभावानं जगणं सोडून दे. तो मद अंगिकारू नकोस, म्हणजेच तुझ्या अंगात तो साकारू देऊ नकोस. दुसऱ्याविषयी तुच्छता आणि स्वत:विषयी अवास्तव दंभभाव जोपासणाऱ्या मत्सराचाही त्याग कर.’’ आता या श्लोकाचा सार्वत्रिक अर्थ आणि मननार्थ यात भेद नाही. तरी त्याचं मनन मात्र आवश्यक आहे! तिकडे आता वळू. -चैतन्य प्रेम

+11 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 8 शेयर

*लोकसत्ता :: चिंतनधारा ४२. साक्षात् खूण :: १ मार्च* जाणते लेकरू, माय लागे दुरी धरू.. तुकाराम महाराजांचा भाव आहे. कारण एकदा लेकरू मोठं झालं, त्याला ज्ञान होऊ लागलं की माय त्याला कडेवर घेत नाही, पदोपदी त्याच्यावर लक्ष ठेवत नाही. तसं तुझं ज्ञान झालं की ज्ञातेपणाचा अहंकार लगेच चिकटतो. गायीच्या आचळाला चिकटलेली गोचीड जशी दूध न पिता गायीचं रक्तच शोषते, ती गत होते. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत परमात्मभाव जागा होण्याची शक्यता असताना प्रत्येक गोष्टीत अहंभाव जागा होऊ लागतो! म्हणून मला ‘जाणोनी नेणते’च ठेव, अशी आळवणी तुकाराम महाराज करतात. असं झालं की लेकरू जसं मातेला धरूनच असतं त्याप्रमाणे तुझ्याशिवाय मी क्षणभरही राहणार नाही. जाणत्या लेकराला माय दूर ठेवतेच, पण कधी कधी तर आईच्या दृष्टिआड राहण्यात जाणत्या लेकरालाही स्वातंत्र्याचा भ्रम होत असतो! तेव्हा मला जाणतं नव्हे, नेणतंच ठेव, असं तुकोबा म्हणतात. भक्तिप्रेमाचं हे मधुर दर्शन आहे. तर ज्याच्या अंतकरणात आत्मकल्याणाची थोडी का होईना, पण खरी तळमळ निर्माण झाली आहे, त्या मुमुक्षुलाही भगवंताची साक्षात प्रेमखूण हवी असते! म्हणजे भगवंत सदैव पाठीशी आहे, याचं चालतं-बोलतं, साक्षात म्हणजे डोळ्यांना दिसणारं प्रत्यंतर हवं असतं. ही प्रेमखूण म्हणजेच खरा सद्गुरू! सुरुवातीला हा भाव असतो की, देवाचं दर्शन हवं असेल, तर जो त्याच्याशी एकरूप आहे त्याची भेट झाली पाहिजे. सदगुरू तत्त्वाची खरी महत्ता, खरी व्यापकता तोवर उमजली नसतेच. देव आणि मी, यांच्यातला तो मध्यस्थ मात्र वाटत असतो. नव्हे, भल्याभल्या आध्यात्मिक तत्त्ववेत्त्यांचंही असंच भ्रामक मत आहे, की गुरूची गरजच काय? बरं असं म्हणणाऱ्यांना सामान्य शालेय ज्ञानसुद्धा गुरूकडूनच घ्यावं लागलं होतं आणि सर्वात व्यापक अशा अध्यात्मज्ञानासाठी मात्र म्हणे गुरूची गरजच नाही! तर प्रथम देव आणि माझ्यातला गुरू हा मध्यस्थ वाटत असतो, पण जसजसा सहवास वाढत जातो, श्रवण-मनन-चिंतन आणि त्यानुरूप आचरण सुरू होतं, तसतसं जाणवू लागतं की, सदगुरू हा मध्य-स्थ आहेच.. पण तो माया आणि मी, भ्रम आणि मी, मोह आणि मी, अज्ञान आणि मी यांच्या मध्ये तो उभा आहे! हा सदगुरू हीच भगवंताचं त्याच्या अंशरूप जीवावर प्रेम असल्याची खूण आहे. ही खूण लाभली, खरा सदगुरू जीवनात आला की खरं जगणं सुरू होईल! जगण्याची जी संधी मिळाली आहे, त्या संधीचं आणि जगण्याचं मोल कळू लागेल. कमळाचं पान पाण्यात बुडत नाही. ते पाण्यावरच तरंगत असतं आणि त्याच्यावर पाणी पडलं तरी ते टिकत नाही, लगेच ओसरून जातं. तसा सदगुरूच्या आधारे व्यवहारात वावरत असूनही मी व्यवहारात बुडणार नाही. एखाद्या योग्याचं मन जसं उन्मन असतं त्याप्रमाणे माझ्या मनावर निंदा-स्तुतीचा अर्थात कोणत्याही अनुकूल वा प्रतिकूलतेचा काहीच परिणाम होणार नाही. हा प्रपंचच मला स्वप्नवत भासू लागेल आणि म्हणून त्यात राहूनही  माझा दृष्टिभ्रम होणार नाही. म्हणजेच आहे ते न दिसणं आणि नाही ते भासणं, हा जो मायेचा गुण आहे त्याचा माझ्यावर प्रभाव पडणार नाही. पण हे साधेल कधी? तर, भगवंताची सदगुरूरूपी प्रेमखूण मिळाली, तरच! त्याच्या सहवासाशिवाय आणि त्यानं केलेल्या बोधानुरूप माझ्या आचरणात पालट झाल्याशिवाय यातली एकही गोष्ट जिवासाठी असाध्यच आहे.

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

*लोकसत्ता :: एकात्मयोग २९३. शांतिब्रम्ह :: २८ फेब्रुवारी २०२०* पृथ्वीकडून अवधूतानं कोणते गुण स्वीकारले, आत्मसात केले, अंगी बाणवले, ते अवधूत सांगत आहे. पृथ्वी अखंड आहे, पण माणसानं तिचे तुकडे पाडले. त्या तुकडय़ांबाबत आसक्त होऊन तो ‘हे माझं शेत, ही माझी जमीन, ही माझी मालमत्ता, हे माझं वैभव’ असं म्हणून त्यांना कवटाळून जगत राहतो. इतकंच कशाला? अवधूत म्हणतो, ‘‘येथ भूतीं पृथ्वी पूजिली। नातरी विष्ठामूत्रीं गांजिली। हर्षविषादा नाहीं आली। निश्चळ ठेली निजक्षांतीं॥३६७॥’’ म्हणजे, या पृथ्वीची कोणी नारळ वाढवून पूजा करो की विष्ठा-मूत्रानं ती मलिन करो; तिला त्या पूजेनं ना आनंद होतो, ना मलिन झाल्याचं दु:ख होतं. पुढे अवधूत म्हणतो, ‘‘आतां पृथ्वीची अभिनव शांति। ते सांगेन राया तुजप्रती। जे शांति धरोनि संतीं। भगवद्भक्ती पावले॥३७०॥’’ अवधूत म्हणतो की, हे राजा, पृथ्वीची शांती ही खरंच अद्भुत आहे. संतांनी ती स्वीकारल्यानं त्यांच्या जगण्यात सहज शांतीचा प्रत्यय येतो. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या अंत:करणावर त्या शांतीचा संस्कार झाल्याशिवाय राहत नाही. या शांतीमुळेच हे संत भगवंताच्या भक्तिप्रवाहात आकंठ बुडाले. मग अवधूत सांगतो, ‘‘पृथ्वी दाहेंकरूनि जाळिली। नांगर घालूनि फाळिली। लातवरीं तुडविली। तोडिली झाडिली पैं भूतीं॥३७१॥ तो अपराधु न मनूनि क्षिती। सवेंचि भूतांतें प्रसन्न होती। तेथेंचि पिकवूनि नाना संपत्ती। तृप्ति देती भूतांतें॥३७२॥’’ म्हणजे, या पृथ्वीला आगीनं भाजतात, नांगरानं जमीन नांगरतात, कुदळीनं तिच्यावर घाव घालतात, लाथेनं तुडवतात, झोडपतात.. पण तरीही ही धरणी राग मानत नाही. उलट अन्नधान्य, फळं-फुलं आणि भाज्या भरभरून पिकवते. माणसाला तृप्त करते. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘एकें अपराधु केला। दुजेनि उगाचि साहिला। इतुकेनि शांतु केवीं झाला। उपेक्षिला अपराधी॥३७४॥’’ एकानं अपराध केला आणि दुसऱ्यानं तो मुकाटय़ानं सहन केला, पण एवढय़ानं तो शांत झाला, असं म्हणता येणार नाही! कारण वरकरणी तो शांत दिसला तरी त्याच्या चित्तात त्या क्षणी अशांती, अस्वस्थता असू शकते! कदाचित निर्बलतेमुळे तो शांत बसलेला दिसू शकतो. पण सामर्थ्य असूनही जो अपराध सहन करतो, त्याची शांती लक्षणीय असते. पण या सर्वापलीकडे  लक्षणीय शांतीपणा तो असतो, जेव्हा समर्थ असूनही तुम्ही तुमच्या बाबतीतला अपराध सहन करताच; पण ज्यानं अपकार केला त्याचं हितच जे साधतात, ते खरे शांतिब्रह्म! मात्र, इथं जो ‘अपराध’ म्हटला आहे, तो खून, चोरी, दरोडा, बलात्कार यांसारखा सामाजिक अपराध नव्हे! सामाजिक अपराधांविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. पण इथं अभिप्रेत असलेला अपराध हा बराचसा माझ्या जीवनात मी माझ्या मानलेल्या माणसांच्या वर्तनातून घडणारा आहे. तो मानसिक अधिक आहे. यात अपमान, उपेक्षा, पक्षपात यांसारख्या गोष्टीही आहेत. आणि आपली खरी शांती तिथंच तर डळमळीत होत असते!

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 15 शेयर

*लोकसत्ता :: चैतन्य चिंतन ४३. सूक्ष्म भेद.. :: २८ फेब्रुवारी* श्रीमहाराज जेव्हा म्हणतात की, ''संत भगवंताशी तद्रूप असतात, पण त्यांच्या हातून घडणार नाही अशी एकच गोष्ट आहे..'' याचा गूढ अर्थ असा की भगवंत आणि श्रीसद्गुरू हे बाह्य़त: एकसमानच भासत असले तरी एका गोष्टीबाबत मात्र श्रीसद्गुरू वेगळे आहेत! ती गोष्ट म्हणजे ते कोणाचेही अनहित करीत नाहीत, होऊ देत नाहीत. अर्थात सुष्टांप्रमाणेच दुष्टांच्याही हिताचीच त्यांना अहोरात्र चिंता असते. भगवंत मात्र जीव जसं कर्म करील तसं फळ त्याला देतो. या खेळात दुष्कर्माचा जोर वाढत गेला की मग सुष्टांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या नाशाकरिता मी अवतार घेतो, असंही भगवंत सांगतो. श्रीसद्गुरू मात्र दुष्टाला नष्ट करण्याचा विचार करीत नाहीत तर त्याच्यातला दुष्टपणा नष्ट करण्याचाच उद्योग अविरत करीत राहातात. 'खळांची व्यंकटी सांडो' हीच त्यांची भावना असते. त्यामुळे जिवाच्या हातून मनाच्या ज्या ओढीमुळे दुष्कर्म घडतात त्या ओढीला लगाम घालण्याचं अत्यंत सूक्ष्म कार्य श्रीसद्गुरू करीत असतात. मनाच्या ओढीनं दुनियेकडे धावणारं मन म्हणजे उताराला लागलेली आणि वेगनियंत्रकही निकामी झालेली गाडी आहे! त्या सुसाट गाडीला थांबवून, वळवून परत वर आणायचं, हे प्रवाहाविरुद्ध पोहोण्याचं ्रकाम श्रीसद्गुरूंनाच साधायचं आहे. त्यासाठी ते स्वत: नामरूप होऊन स्वतचं दान मला देतात. विचार करा, स्थूल देहातले श्रीमहाराज आपल्या घरी आले तर आपण त्यांची उपेक्षा करू की शक्य तेवढी त्यांची सेवा करू? अर्थातच आपण त्यांची उपेक्षा करणार नाही. मग सूक्ष्म नामरूपाने ते माझ्या अंतरंगात शिरले असताना त्या सूक्ष्म रूपाची सेवा म्हणजेच मानसिक जप आहे! त्या मानसिक जपानंच दुष्कर्माकडे असलेली माझी ओढ मंदावणार आहे. तेव्हा श्रीसद्गुरू कोणालाही अव्हेरत नाहीत, पण खळांची व्यंकटी मोडल्यावाचून स्वस्थही बसत नाहीत. मग त्या प्रक्रियेत किती का जन्म जाईनात! ती व्यंकटी, वाकडेपणा मोडण्याचे त्यांचे उपाय आणि मार्ग आपल्या कल्पनेपलीकडचेच असतात. 'हृद्य आठवणी'त बाळंभटाची एक आठवण आहे. ही आठवण म्हणजे आपल्या पुढील प्रदीर्घ चिंतनाचा एक दुवा ठरणार आहे. भिक्षुकी करणाऱ्या या बाळंभटाला नामाला लावायचं, गोंदवल्यात नेऊन एका मंदिराचं पुजारीपण द्यायचं महाराजांनी ठरवलं. त्या बाळंभटाला गांजाचं व्यसन होतं. तो म्हणाला, ''महाराज, ते नामबिम काही मी जाणत नाही. मला रोज चार आण्याचा गांजा लागतो. तो देणार असाल तर मी गोंदवल्यात येऊन राहीन.'' श्रीमहाराजांच्या चरित्रात बाळकोबा परिचारक यांचीही एक कथा आहे. ते तर श्रीमहाराजांना म्हणाले, ''मी उगीच जप करीत बसणार नाही. माझे काम थोडक्यात झाले पाहिजे. नाहीतर तुमचा काय उपयोग?'' (चरित्र/प्रकरण सातवे) जे मनात आहे ते न लपविता थेट प्रकट करण्यालाही मन सरळ असावं लागतं. हा न जाणवणारा आपलेपणाच आहे. नवविधाभक्तीत यालाच आत्मनिवेदन म्हणतात! तेव्हा महाराज बाळंभटांना म्हणाले, ''वा! अशी स्पष्टवक्ती माणसं मला आवडतात. मी तुमचं व्यसन पुरवीन, तुम्ही नाम मात्र घ्यायचं!''

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB