श्रीधर ब्राम्हणाची पोटदुखी बरी झाली श्रीधर नावाचा एक ब्राम्हण कर्नाटकात राहत होता. तो पोटदुखीच्या आजाराने बेजार झाला होता. त्याने अनेक वैदयांचे औषधे घेतली. पण काही फरक पडला नाही. म्हणून तो गाणगापूरला गेला. तेथे जाऊन त्याने काही दिवस श्री दत्तगुरूंच्या पादुकांची पूजा केली. एक दिवस त्याला पोटदुखीचा खूप त्रास झाला. पहाटे पहाटे त्याला श्री दत्तमहाराजांनी स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले, “श्रीपुरीच्या झाडाच्या पानांचा रस काढून त्यात सुंठ आणि सैंधव घालून त्या मिश्रणाचे तीन दिवस भक्षण कर. त्याने पोटदुखी थांबेल.” सकाळी त्याला जाग आल्यावर तो श्रीपुरीचे झाड शोधू लागला. पण श्रीपुरी कुठल्या झाडाला म्हणतात हेच कळेना. गावकऱ्यांनाही काही सांगता येईना. त्या रात्री पुन्हा त्याला स्वप्नदृष्टांत झाला आणि स्वप्नात दत्तप्रभूंनी सांगितले की, “अक्कलकोटला जा. तेथे श्री स्वामी समर्थ आहेत. ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील.” श्रीधर ब्राम्हण सकाळी अक्कलकोटला जायला निघाला. दोन दिवसांनी अक्कलकोटला येऊन पोहोचला. श्रीस्वामी विहिरीजवळच्या कट्टयावर बसले होते. तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, “या, आम्ही तुमचीच वाट पहात बसलो होतो.” त्याने स्वामींना वंदन केले. लगेच स्वामी म्हणाले, “अरे लिंबाच्या झाडाला श्रीपुरीचे झाड म्हणतात. अक्कलकोटात श्रीपुरीचे खूप झाडे आहेत. त्याचा पाला घेऊन रस काढ आणि त्यात सुंठ आणि सैंधव घाल. ते मिश्रण तीन दिवस घे. तीन दिवसांनी तुला पूर्ण बरे वाटेल. त्याने ते औषध घेतल्यावर त्याची पोटदुखीची व्याधी पूर्णपणे बरी झाली. आपल्या गावाला जाऊन त्याने श्रीस्वामींची लीला सर्वांना सांगितली. तेव्हापासून तो स्वामींचा परमभक्त झाला.
कामेंट्स
छाया शिर्के Apr 8, 2021
श्री स्वामी समर्थ 🙏🙏